रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दिनी जुन्याच गणवेशात झेंडावंदन होण्याची शक्यता

Aug 14, 2024 - 14:23
 0
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वतंत्र दिनी जुन्याच गणवेशात झेंडावंदन होण्याची शक्यता

रत्नागिरी : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक नियमित व दुसरा स्काउट-गाइडचा गणवेश देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते.

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पहिल्या सत्रातील घटक चाचणीही संपली. स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर आहे, तरी अद्याप गणवेशाबाबत विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच असून, यावर्षी स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशावर साजरा करावा लागण्याची शक्यता आहे.

समग्र शिक्षाअंतर्गत राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश वितरण करण्यात येते. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाताे. या गणवेशाचे पैसे प्रत्येक विद्यार्थ्यांना दिले जात हाेते.

मात्र, यावर्षी शासनाने नियमित गणवेश व स्काउट-गाइडचा गणवेश असे दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यातील नियमित गणवेश महिला बालविकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांकडून शिवून मिळणार आहे. या गणवेशाचे कापड बचतगटांना प्राप्त झाले आहे. मात्र, त्यांच्याकडील शिलाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

मुलींसाठी कापडच आलेले नाही

स्काउट-गाइडचा गणवेश पंचायत समितीच्या माध्यमातून शासन देणार आहे.
मुलांच्या स्काउट-गाइड गणवेशाचे कापड आले असले तरी मुलींच्या गणवेशाचे कापड अद्याप प्राप्त नाही. नियमित गणवेश महिला बालविकास महामंडळाकडे
नियमित गणवेश महिला व बालविकास महामंडळाकडे

नियमित गणवेश तयार करण्याचे काम महिला व बालविकास महामंडळाकडे देण्यात आले आहे. महामंडळातर्फे बचतगटांना काम देण्यात आले असले, तरी अद्याप कामाची पूर्तता झालेली नसल्यामुळे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.

गतवर्षीही दुसऱ्या गणवेशासाठी झाला विलंब

गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पहिला गणवेश वेळेत वितरित करण्यात आला. त्यातही अनेक अडचणी आल्या होत्या, तर दुसरा गणवेश मिळण्यास विलंब झाला होता.
यावर्षी तर गणवेशाचे कापड मिळण्यास विलंब झाला तर कापड वेळेवर न मिळाल्यामुळे शिलाईचे कामही रखडले आहे.

शिलाई पूर्ण न झाल्यामुळेच गणवेश प्राप्त झालेले नाही. स्वातंत्र्यदिनासाठी मुलांना गणवेश मिळावा, यासाठी आधीच नियोजन करणे गरजेचे होते. वेळेवर गणवेश मिळावा, यासाठी जुन्या पद्धतीने गणवेश वितरण करण्यासाठी परवानगी मिळावी. - दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow