'लाडकी बहीण योजने'चे पैसे हळूहळू 3 हजार करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aug 19, 2024 - 10:18
 0
'लाडकी बहीण योजने'चे पैसे हळूहळू 3 हजार करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. त्यामुळे, लाडक्या बहिणींना आणखी एक गुडन्यूज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढत जावून टप्या-टप्यापर्यंत तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून (Ladki bahin yojana) मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही यावेळी शिंदेंनी सांगितले. माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हांला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहीणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकत द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे. ही योजना महिलाना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे, असेही शिंदेनी म्हटले.

17 ऑगस्ट लाडकी बहीण दिवस

लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करित आहे. यावेळी त्यांनी 17 ऑगस्ट हा दिवस 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करुया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

1 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम, विकसीत करुन मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावे लागेल,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शासन महिला केंद्रीत योजना राबवित आहे. एसटीच्या प्रवास भाडे शुल्कात महिलांना 50 टक्के सुट यासारख्या योजनेमुळे तोट्यात असलेली एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना याबरोबरच आता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. लवकरच आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. शेतकऱ्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल शासन भरणार आहे. 12 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात 12 महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

आधार लिंकींग होताच पैसे जमा होतील

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वांत जास्त ऑनलाईन नोंदणी गतीमान पद्धतीने झाली आहे. 90 टक्क्यापेक्षा अधिक बहिणींना लाभ वितरित झाला आहे. ज्यांचे आधार लिंकींग झाले नाहीत त्यांचे आधार लिकींग करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील. या योजनेत अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow