मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना: 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी अर्ज करावेत - सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे

Aug 19, 2024 - 16:22
 0
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना: 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी अर्ज करावेत - सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे
रत्नागिरी : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना नुकतीच घोषित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वय वर्षे 60 वरील ज्येष्ठ नागरिकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. 
   
भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयां मधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
    
या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रा पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थी वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष साठवरील ज्येष्ठ नागरिक असावा.
    
या योजनेअंतर्गत विविध दळणवळणाच्या साधनांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच आय आर सी टी सी किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित नियमांच्या निविदा प्रक्रियेचे पालन करुन करण्यात येईल. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. तरी, इच्छुक नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow