चिपळुणात पूरमुक्तीसाठी व्यावसायिक एकवटले

Jul 13, 2024 - 16:07
Jul 13, 2024 - 16:09
 0
चिपळुणात पूरमुक्तीसाठी व्यावसायिक एकवटले

चिपळूण : शहरात थोड्याशा पावसामुळे साचणाऱ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर देथील जागरूक नागरिकांनी चर्चा करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी वाशिष्ठीला डोंगर उतारावरून येणारे नाले मिळतात, त्या सर्व नाल्यांचे व ओढ्यांचे सर्वेक्षण करून पालिकेने या नाल्यांची व्यवस्था लावण्याबाबत चर्चा झाली व या संदर्भात पालिकेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शहरातील काणे बंधू यांच्या सावरकर सभागृहात शुक्रवारी ही बैठक झाली. या बैठकीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शहरामध्ये २०२१ मध्ये मोठा पूर आला. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसला. यानंतर झालेल्या उठावांतर्गत चिपळूण बचाव समितीने केलेल्या आंदोलनामुळे वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात देखील चर्चा झाली. यावेळी बोलताना बापू काणे यांनी, आपण नेहमीच पूर आला की प्रशासनाला जबाबदार धरतो वार्तांकन माध्यमांना करणाऱ्या देखील चिपळूणबाबत चुकीची माहिती प्रसारित केली असा आक्षेप घेतो. मात्र चिपळूणकर म्हणून आपण काय करतो हे देखील महत्वाचे आहे. गाळ काढल्याने निश्चितच पुराची तीव्रता कमी झाली आहे. त्याहीपेक्षा चिपळूणकर नागरिकांनी काय करायला हवे ते महत्त्वाचे आहे. शासनाकडे आपण पूरमुक्तीसाठी मागणी करू. निधीसाठी पाठपुरावा करू, पण चिपळूणकरांची जी जबाबदारी आहे ती पाळली आहे का?, असा सवाल उपस्थित केला. 

बांधकामे करताना ओढे नाले अडवून त्यावर स्लॅब टाकून किंवा बुजवून बांधकामे करण्यात आली आहेत, पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नाहीत. त्यामुळे आईस फॅक्टरी, नाथ पै चौक, वाचनालय, बहादूरशेख येथील बांगडे कॉम्प्लेक्स अशा भागात पाणी साचत आहे, त्याला आपणच जवाबदार आहोत. त्यासाठी न.प. वर दबाव आणायला हवा व त्यासाठी कायमस्वरूपी पाठपुरावा करून मार्ग काढावा. परस्पर आरोप न करता चिपळूणच्या हितासाठी एकत्र येऊन शहरात साचणारे पाणी कसे वाशिष्ठी, शिव नदीपर्यंत वाहून जाईल यासाठी नाले मोकळे करायला हवेत असे मत मांडले. राजेश वाजे व बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष तडसरे यांनीदेखील मत मांडताना क्रेडाई अंतर्गत येणाऱ्या सर्व बांधकाम व्यावसायिकांना सक्त सूचना दिल्या आहेत. बिल्डिंग बांधताना गटार सोडावे, नदी, नाले अडवू नयेत अशा सूचना केल्या आहेत. असा कोणी आढळल्यास त्याची संघटना बाजू घेणार नाही, असे वाजे यांनी सांगितले, माजी नगरसेवक विजय चितळे यांनी यावेळी आपली स्पष्ट भूमिका मांडली. शहरात पाणी शिरण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाशिष्ठी, शिव नदीला मिळणारे बहुतांश नाले, पऱ्हे हे बंद करण्यात आले आहेत. त्यावर बांधकामे उभी राहिली आहेत. २०२१ च्या पुरानंतर देखील आपण जागे झालेलो नाही त्यामुळे परवा शहरात आलेले पाणी हे पाण्याला वाट मोकळी नसल्यामुळे आले. जरा पाऊस पडला तरी आईस फॅक्टरीजवळ पाणी येते. शहरात कोणतेही नियोजन नाही. नगरपालिका नुसती बांधकाम परवानगी देते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती लक्षात घेत नाही. या बाबत आता नागरिकांनी कठोर व्हायला हवे. अशी स्पष्ट भूमिका मांडली. माजी नगरसेवक मिलिंद कापडी यांनी देखील शहरातील नाले, पऱ्हांच सर्वेक्षण करण्यासाठी आम्ही काही वर्षापूर्वी प्रयत्न केला होता. शहरातील एका एजन्सीला काम देण्यात आले होते. मात्र, तो सर्व्हे झाला नाही. डोंगर उतारावरून अनेक पऱ्हे आज अडविले गेले आहेत. काही ठिकाणी ते निमुळते झाले आहेत तर काही नाले, पऱ्हे नष्ट करण्यात आले आहेत. 

यामुळे नैसर्गिक प्रवाह बंदीस्त झाल्याने पाणी जाणार कुठे? पालिकेने असा सर्व्हे करावा. माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी, वाशिष्ठी, शिव नदीतील गाळ काढल्याने पुराची तीव्रता कमी होण्यास निश्चितच मदत झाली आहे. खासगी क्षेत्रात टाकलेला गाळ चुकीचा आहे. परंतु बांधकाम व्यावसायिक देखील बाहेरून आणून भराव करीत आहेत. त्याला कसे रोखणार? शहराची वाढ व्हायची असेल तर विकासकामे रोखता येणार नाहीत. मात्र, विकासकामे करताना ती नियमात व्हायला हवीत. आता डोंगर उतारावरून येणारे पाणी शहरात अडत आहे. ती जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे हे नाले, पऱ्हे रुंद व स्वच्छ करणे गरजेचे आहे. तर शहरात पाणी अडणार नाही.

मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष देशमुख, पत्रकार समोर जाधव महेंद्र कासेकर, राजेंद्र शिंदे, संदीप बांद्रे नागेश पाटील यांनीदेखील आपली बाजू मांडली. प्रसिद्धी माध्यमांना यामध्ये जबराबदार धरता कामा नये, माध्यमे वस्तुस्थिती मांडत असतात. मात्र, फेक न्यूज होत असेल तर तत्काळ त्याची स्पष्टता आली पाहिजे. सोशल मीडियाला अडविता येत नाही. मात्र, सोशल मीडियावर चुकीचे वृत्त प्रसारित होत असेल तर त्याची स्पष्टता करणारे वृत्त शहरवासीवांच्या हितासाठी प्रसारित केले पाहिजे ही आपली भूमिका आहे असे सांगून शहरामध्ये पाण्याचा निचरा योग्य होईल, यासाठी व्यापाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. यावेळी व्यापारी, बांधकाम व्यावसायिका प्रसाद खातू, राहुल काळी, मंगेश वाजे, राजन मिलेकर आदीसह नागरिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:33 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow