लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Aug 19, 2024 - 17:14
 0
लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई : सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांच्या खात्यात महिना 1500 रुपयांच्या मदत देणार आहे.

अनेक महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. मात्र, अनेक महिलांना या योजनेसाठी अर्ज करताना अडचणी येत आहेत. वारंवार सर्व्हर बंद होत असल्याचे दिसत आहे. यामुळं लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

लाभार्थींना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावं लागतंय
शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत आहे. काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. सहा-सहा तास ओटीपी येत नाही. त्यामुळं लाभार्थींना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळं अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळं या योजनेच्या मुदतीची अट काढून टाकावी जेणेकरुन राज्यातील सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येईल अशी मागणी माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबतचे ट्विट सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाच्या मोठ्या रांगा
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात शासनाने या योजनेची घोषणा केली तेव्हा या योजनेची मुदत 15 जुलै ही होती. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात योजना नोंदणीची अंतिम तारीख काढून टाकावी अशी मागणी केली होती. तसेच या योजनेचा लाभ राज्यातील 60 वर्षावरील जेष्ठ महिलांना सुद्धा मिळावा यासाठी वयोमर्यादेची सुद्धा अट काढली जावी अशी सुद्धा मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली तसेच कमाल वयोमार्यादा 60 वर्षे ची 65 वर्षे केली. परंतु अजूनही लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाच्या मोठ्या रांगा आहेत. सॉफ्टवेअरचा वाढता तांत्रिक बिघाड पाहता 31 ऑगस्ट ही लाडकी बहिण योजनेची मुदत काढून ही योजना "सामाजिक सुरक्षा हक्क" या स्वरुपाची करुन राज्यातील सर्व पात्र बहिणींना कधीही लाभ मिळवता येईल असा बदल करण्याबाबतची आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow