रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रवाशांचा खोळंबा

Aug 22, 2024 - 09:52
 0
रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रवाशांचा खोळंबा

◼️ विद्यार्थी, कामगारवर्ग आणि वयोवृद्ध मंडळींचे हाल

रत्नागिरी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या रत्नागिरीतील कार्यक्रमासाठी गर्दी जमण्याकरीता एसटीच्या गाड्यांचा वापर करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर डेपोतून एसटीच्या गाड्या कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्या.

एसटी विभागाने नियमित गाड्या रदद करून त्या गाड्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या चंपक मैदान येथील कार्यक्रमासाठी पाठवल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एसटीची वाट पहात बुधवारी अनेक प्रवासी बसस्टॉपवर वाट पहात ताटकळत उभे राहिले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राजापूर आणि रत्नागिरीतील एसटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला.

चंपक मैदानावरील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी माणसे आणण्याकरीता एसटीच्या गाड्यांचा वापर करण्यात आल्याने एसटीच्या नियमित फेऱ्या रदद झाल्या. चंपक मैदानावरील कार्यक्रम नियोजित असतानाही एसटी प्रशासनाने बुधवारी कोणत्या गाड्या रदद होणार याची कोणतीही माहिती प्रवाशांना दिली नाही. त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल झाले. विद्यार्थी, कामगारवर्ग आणि वयोवृद्ध मंडळींना बसची वाट पहात बसावे लागले. 

ही गोष्ट लक्षात येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एसटी प्रशासनाला जाब विचारला आहे. राजापूर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी राजापूर एसटी आगारात धडक दिली. एसटीच्या गाड्या रदद करुन त्या कार्यक्रमाला पाठवल्याबददल आमदार राजन साळवी यांनी जाब विचारला. यावेळी सर्व शिवसैनिकांसोबत त्यांनी ठिय्या आंदोलन केले. 

याप्रसंगी संघटक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, विभागप्रमुख संतोष हातणकर, महिला आघाडीच्या प्राची शिर्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरीतील एसटीच्या विभागीय कार्यालयावर बुधवारी शिवसैनिकांनी धडक दिली. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी रत्नागिरी तालुक्यातील एसटीच्या 26 गाड्या रद्द केलात, त्याची माहिती प्रवाशांना का दिली नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि वयोवृध्द लोकांचे हाल झाले. त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा त्यांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विजय देसाई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow