म्हणून आजच्या कार्यक्रमावर भाजप ने टाकला बहिष्कार…
रत्नागिरी : महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्क्रमांतर्गत आज रत्नागिरीत शासनाच्या वतीने एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकडे भाजप पक्षाने फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही दिवसांत महायुतीतील कुरबूर अधिक वाढत असल्याचे दिसतंय. त्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांच्यात दोन दिवसांपूर्वी मोठी जुंपल्याचे दिसून आले. भाजपकडून अनेकठिकाणी रामदास कदम यांच्या विरोधात निदर्शने देखील केली. याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील समोर आली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका समोर आली नाही. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे देखील उपस्थित राहणार होते, मात्र ते दोघेही उपस्थित राहिले नाहीत. तर मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आलेला दौरा देखील अचानक रद्द झाला. यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने कोकणात महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता बीजेपी चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केळी आहे.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना आजच्या कार्यक्रमाला बीजेपीकडून टाकण्यात आलेल्या बहिष्काराबाबत विचारले असता ते म्हणाले की रामदास कदम रवींद्र चव्हाणांबाबत जे बोलले त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेणे आवश्यक होते. आज देवेंद्रजी आले असते तर आम्ही आमचे म्हणणे त्यांच्याजवळ ते मांडणार होतो. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रवींद्र चव्हाण हे दोघेही आले नाहीत. आमचे नेते जर येत नसतील व एकनाथ शिंदे यावर बोलत नाहीत तोपर्यंत आम्ही सहकार्य करण्याच्या भूमिकेत नाही. आमचा येथील स्थानिक नेतृत्वावर राग नाही असा खुलासा देखील राजेश सावंत यांनी केला आहे. सुरुवात रामदास कदमांनी केली त्याला पत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिले यावर एकनाथ शिंदे यांनी बोलणे आवश्यक होते. मात्र ते अद्यापही बोलले नाहीत. भाजपला जर नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर भाजप बरोबर कशाला राहिला पाहिजे ? आमची अपेक्षा हीच होती की एकनाथ शिंदे यांनी यावर बोलले पाहिजे. ते एकही शब्द बोलत नाहीत याचा अर्थ आमच्या नेत्याचा अपमान त्यांना मान्य आहे असेच दिसून येते असा खुलासा राजेश सावंत यांनी केला आहे.
What's Your Reaction?