"आज महाराज हवे होते, नराधमांचे हातपाय कापून त्यांचे चौरंग केले पाहिजेत" : राज ठाकरे

Aug 23, 2024 - 14:06
 0
"आज महाराज हवे होते, नराधमांचे हातपाय कापून त्यांचे चौरंग केले पाहिजेत" : राज ठाकरे

मुंबई : बदलापूर येथे मुलीवर अत्याचार झाला. ही घटना मनसेच्या महिला सेनेने उघडकीस आणली. तेव्हा लोकांना समजले. तोपर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराज आज हवे होते.

ही महाशक्ती आता हवी होती. या नराधमांचे हातपाय कापून त्यांचे चौरंग केले पाहिजेत, या शब्दांत राज ठाकरे यांनी बदलापूर घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. यवतमाळमधील एका सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विविध मुद्द्यांवर सडेतोड शब्दांत भाष्य केले.

राज्यभरात घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला राग येतो की नाही. येत असेल तर तो व्यक्त करण्याची जागा म्हणजे विधानसभा निवडणूक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही तुमचा राग मतांच्या माध्यमातून व्यक्त करायला हवा. तुम्ही जर असेच राहिलात, तर तुमच्या नशिबी अशीच माणसे येत राहणार. असेच सरकार येणार. तुमचे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. मराठवाड्याचा दौरा केला, आता विदर्भाचा दौरा करत आहे. पुढेही दौरे सुरू राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत २०० ते २५० उमेदवार उभे करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही, यात पोलिसांचा दोष नाही

राज्यात अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही. यासाठी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांच्यावर जो सरकारी दबाव असतो, त्या दबावामुळे पोलिसांना तसे वागावे लागते. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की, यांचे निलंबन करणार, नोकरीवरून काढून टाकणार, यांच्या चौकशा लावणार, परंतु, जे सरकारमध्ये बसलेत, त्यांच्या चौकशा कुणी लावत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. कोणतीही गोष्ट सहज बोलत नाही, अत्यंत गांभिर्याने सांगतो आहे. एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या. राज्य कारभार कसा केला जातो. कायद्याची काय भीती असते. हे तुम्हाला दाखवून देतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील मुलीकडे आणि महिलेकडे वाकड्या नजरेने कुणी पाहायची हिंमत करणार नाही. याच पोलीस यंत्रणेला सांगणार. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या पोलिसांना ४८ दिले तर संपूर्ण महाराष्ट्र साफ करून ठेवतील. सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण अंगावर कोण घेणार, असा सवाल करत, महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. परंतु, सरकारी लोक गोलगोल उत्तरे देतात. या सगळ्या गोष्टींवर उत्तरे आहेत. महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदारसंघात राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करतो. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकर यांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 23-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow