रत्नागिरी : पोर्ट औद्योगिक क्षेत्राला एकमताने स्थानिकांचा विरोध; जाकीमिऱ्या ग्रामसभेत ठराव

Aug 24, 2024 - 09:52
Aug 24, 2024 - 10:08
 0
रत्नागिरी  :  पोर्ट औद्योगिक क्षेत्राला एकमताने स्थानिकांचा विरोध; जाकीमिऱ्या ग्रामसभेत ठराव

रत्नागिरी : शहराजवळील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. मात्र शुक्रवारी मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या औद्योगिक क्षेत्राला एकमताने विरोध केला. तसा ग्रामसभेचा ठराव केला. 

त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या बाबत एमआयडीसीला काही सांगायचे असेल तर दोन्ही गावांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली. सरपंच आकांक्षा कीर यांनी याला दुजोरा दिला. मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायीतमध्ये जाकीमिऱ्या आणि सडामिऱ्या ही गावे येतात. या गावातील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना २९ जुलैला प्रसारित झाली आहे. विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. मात्र, याला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आज जाकीमिऱ्याची ग्रामसभा झाली. ग्रामसभेला सरपंच आकांक्षा कीर, भाजपचे माजी आमदार बाळ माने, कौस्तुभ सावंत यांच्यासह सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत विषय पत्रिकेवरील विषयानुसार चर्चा झाली. त्यानंतर आयत्या वेळच्या विषयात पोर्ट औद्योगित क्षेत्र घोषित केल्याच्या विषयावर चर्चा झाली. आम्हाला पर्यावरणपूरक उद्योग हवे. यामध्ये आमच्या कलमे, घरं जाणार आहे. याला आमचा ठाम विरोध असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले. 

या औद्योगिक क्षेत्राला सर्वांनी कडाडून विरोध केला. तसा एकमुखी विरोधाचा निर्णय घेऊन ठराव करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना या ठरावाची प्रत दिली जाणार आहे. नोटिसांनादेखील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत आपले म्हणणे मांडायचे असले तर त्यांनी जाकीमिऱ्या, सडामिऱ्या दोन्ही गावांची एकत्रित बैठक लावावी, असे स्थानिकांनी स्पष्ट केले.

स्थानिकांनी पोर्ट औद्योगिक क्षेत्राला विरोध केला आहे. या विरोधामुळे या क्षेत्राचे भवितव्य आता अंधारात आहे. एमआयडीसी किंवा उद्योग विभाग याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 24/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow