समुद्र खवळलेला..; मुंबईतील तीनशे नौका जयगडमध्ये आश्रयाला

Aug 26, 2024 - 10:30
 0
समुद्र खवळलेला..; मुंबईतील तीनशे नौका जयगडमध्ये आश्रयाला

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी वेगवान वाऱ्यासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून रत्नागिरी तालुक्यात दोन घरांचे नुकसान झाले आहे. वेतोशी येथे रस्ता खचला आहे. तसेच वादळामुळे समुद्र खवळला असून मासेमारी ठप्प झाली आहे. मुंबईच्या सुमारे तीनशेहून अधिक नौका सुरक्षेसाठी जयगड बंदरात दाखल झाल्या आहेत.

कोकण किनारपट्टीवर २७ तारखेपर्यंत ताशी ३५ ते ४५ किलोमिटर पर्यंत वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ७०.१३ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड ८२.८०, दापोली ५५.९०, खेड ५४.१०, गुहागर ७६.५०, चिपळूण ५४.६०, संगमेश्वर ८२.१०, रत्नागिरी ७८, लांजा ७९.१०, राजापूर ६८.१० मिमि पाऊस झाला. १ जूनपासुन आतापर्यंत सरासरी २९७५.६६ मिमि पाऊस पडला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, शास्त्री, अर्जूना, कोदवली, काजळी या नद्या दूथडी भरून वाहत आहेत. सुदैवाने अजुनही पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही. शनिवारी आणि रविवारी सलग दोन पाऊस पडत असल्यामुळे रत्नागिरी शहरात बाजारपेठ, जेल रोड, मारुतीमंदिर, सन्मित्र नगर या परिसरात काही काळ पाणी साचलेले होते. पाऊस कमी झाल्यानंतर पाणी ओसरले. वेगवान वाऱ्यामुळे कळझोंडी येथील रवींद्र हरिश्चंद्र वीर यांच्या घराची १०० कौले पडून गेल्यामुळे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. वेतोशी येथे रस्ता एका बाजूने खचला असून कोणतीही हानी झालेनी नाही. तोणदे गावातील विजय यशवंत महाकाळ यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळून सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर नवानगर येथील एका घराच्या मागील माती पावसामुळे कोसळली. मात्र कोणतेही नुकसान झालेले नाही.

मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा मच्छीमारांना बसलेला आहे. सलग तिन दिवस मासेमारी ठप्प झाली आहे. मुंबईहून मासेमारीसाठी खोल समुद्रात आलेल्या तिनशेहून अधिक नौकांनी जयगड किनाऱ्यावर सुरक्षेसाठी नांगर टाकलेला आहे. यंदा हंगामाला सुरूवात झाल्यानंतर प्रथमच सलग मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळलेला असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. वादळ शांत होईपर्यंत जयगड बंदरात आलेल्या नौका थांबून राहणार आहेत. त्यांना आवश्यक त्या सुविधा स्थानिक मच्छीमारांकडून दिल्या जात आहेत. पावसाचा जोर अजून दोन दिवस राहणार असल्यामुळे मच्छीमारांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow