पंतप्रधान मोदी कुणाचंच ऐकत नाहीत : राहुल गांधी

Aug 27, 2024 - 15:10
 0
पंतप्रधान मोदी कुणाचंच ऐकत नाहीत : राहुल गांधी

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या लोकांची राहुल गांधी हे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहेत.

अशातच श्रीनगरमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींविषयी नेमकं काय वाटतं याबाबत राहुल गांधी यांनी सांगितले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे खासदार जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी या विद्यार्थिनींसमोर विविध प्रश्नांवर आपली मते मांडली. या मुलाखतीचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नेमकी अडचण काय आहे याबाबत भाष्य केलं. तसेच राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाविषयीसुद्धा प्रतिक्रिया दिली.

काश्मिरी विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांना तुमचा लग्नाचा काय विचार आहे असं विचारलं. "मी लग्नाची योजना आखत नाही, पण तसे झाले तर ते (चांगले) आहे. २०-३० वर्षांपूर्वीच लग्नाच्या दबावातून मी बाहेर आलो आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी त्या मुलींना आपल्या लग्नात बोलावणार असल्याचेही सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत असलेल्या दोन अडचणींबाबतही सांगितले. "मला काश्मीरमधील माध्यम स्वातंत्र्याची मोठी अडचण दिसते आहे आणि देशभरात हेच चित्र आहे.पंतप्रधानांबाबत माझं मत आहे किंवा माझी त्यांच्याबाबत अडचण ही आहे की ते कुणाचंच ऐकत नाहीत. सुरुवातीपासूनच आपण बरोबर असल्याचे गृहीत धरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मला समस्या आहे. त्यांना जरी सारंकाही दिसत असलं, कुणी त्यांना सांगत असलं की ते जे बोलत आहेत ते चुकीचं आहे तरी ते ही बाब मान्य करणार नाहीत. त्यामुळे या प्रकारची व्यक्ती नेहमीच काही ना काही समस्या निर्माण करते. हे असुरक्षिततेतून येते, ते सामर्थ्याने येत नाही. ते दुर्बलतेतून येते," असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकांबद्दलही भाष्य केलं. "भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून घेतला गेला आहे. आम्हाला हे काम आवडले नाही. पण, आता आमच्यासाठी राज्याचा दर्जा परत मिळवणे हे तत्त्व आहे आणि त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांचे प्रतिनिधित्व समाविष्ट आहे. दिल्लीतून हे राज्य चालवण्यात अर्थ नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 27-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow