रत्नागिरी : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला पालकमंत्री उदय सामंत यांची अचानक भेट

Aug 28, 2024 - 10:17
 0
रत्नागिरी : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला पालकमंत्री उदय सामंत यांची अचानक भेट

◼️ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलात तर घरी बसवणार; पालकमंत्र्यांनी दिला सज्जड दम

त्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वसतिगृहाला अचानक भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींबाबत माहिती घेतली.सामंत यांनी अचानक भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल पालकमंत्र्यांच्या नजरेत आले.

ते पाहिल्यानंतर पालकमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांना दिले जाणारे निष्कृष्ट दर्जाचे जेवण पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

समाजकल्याण वसतिगृहामध्ये ८५ विद्यार्थी राहतात. त्यांचे जेवण, नाश्त्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले असून या कंपनीकडून निष्कृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शासनाच्या जीआरनुसार ज्या पद्धतीने मेनू ठरवून दिला आहे, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जेवण दिले जात नसल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आले. त्यांनी जेवणासंदर्भात आणि इतर समस्यांसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना शासनाकडून दिले जाणारे भत्ते, युनिफॉर्म आणि इतर सोयीसुविधांचा अभाव असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी पुरवत नसल्याने पालकमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची समिती तयार केली असून त्यांच्याशी ते आता संवाद साधणार असून जेवण चांगले होते, असे विद्यार्थी सांगतील तेव्हाच संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी समाजकल्याण अधिकारी संतोष चिकणे यांना दिल्या. विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी समजून त्यांना आवश्यक सर्व बाबी पालकमंत्री म्हणून पुरवण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि शिवसेने तालुकाप्रमुख बाबू म्हाप, रत्नागिरी एमआयडीसीच्या आरओ वंदना खरमाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जनक धोत्रेकर,समाज कल्याण अधिकारी संतोष चिकणे आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow