'कोकणचा साज'ची बीजे पांगरी गावात रुजली : सुनील बेंडखळे

Jul 30, 2024 - 11:10
Jul 30, 2024 - 13:43
 0
'कोकणचा साज'ची बीजे पांगरी गावात रुजली : सुनील बेंडखळे

पावस : वडिलांनी १९८६ मध्ये बावनदी सोडून पांगरीमध्ये राहण्याचे ठरवून त्या ठिकाणी किराणा दुकान सुरू केले आणि माझे आयुष्य बदलून गेले. या गावात राहिलो नसतो तर कदाचित जो मी आज आहे तो बनू शकलो नसतो. या गावाने मला नाटक, भजन, कीर्तन, झांज, ढोलकी या सर्व गोष्टींची गोडी लावली. त्यामुळेच लोकनाट्यासारखा संगमेश्वरी बोलीचा प्रयोग सादर करावा, अशी कल्पना सुचली, रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि टीमवर्कमुळेच आम्ही रंगभूमीवर उभे आहोत, असे प्रतिपादन सुनील बेंडखळे यांनी केले.

गोळप कट्टाच्या कार्यक्रमात कोकणचा साज संगमेश्वरी बाज लोकनाट्याचे सर्वेसर्वा सुनील बेडखळे यांनी आपला प्रवास उलगडला, त्यांनी सांगितले, रत्नागिरीत नोकरीत अनिकेत गानू हा मित्र मिळाला व त्याच्यामुळे स्टार थिएटरमध्ये काम सुरू केले. ऑर्केस्ट्रा, मैफल हे सुद्धा सुरू होते.

लाईट, म्युझिकची कामे मिळू लागली मग अभिनयाकडे वळलो. देवरूखचे आनंद बोंद्रे हे मी संगमेश्वरी बोलतोयचे प्रयोग करायचे. त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जाऊ लागलो. विच्छा माझी पुरी करा, हा त्यांचा प्रयोग पाहिला आणि भारावलो. कोळंबेत प्रयोग असताना त्यांना बाहेरगावी जावे लागल्याने मला कार्यक्रमाची संधी मिळाली आणि बोंद्र यांच्यासोबत ५०० प्रयोग केल्याचा अनुभव पाठीशी होताच.

लोकनाट्यासारखा संगमेश्वरी बोलीचा प्रयोग सादर करावा, अशी कल्पना सुचली, कलाकार प्रभाकर डाऊल, सचिन काळे, रवी गोणबरे यांना घेऊन कार्यक्रमाचे नाव कोकणचा साज संगमेश्वरी बाज हे नाव ठरवले, नमन, जाखडी, भजन, गावकर असे सगळे प्रकार त्यात आणले. प्रत्येक प्रयोगाला अफाट प्रतिसाद मिळाला. आज सुमारे २५ जणांचा ग्रुप आहे. लाईट, म्युझिक, साउंड, मेकअस्, वेशभूषा, सेट लावणारे इत्यादी सगळे आमच्यातीलच आहेत. आपापले व्यवसाय नोकरी सांभाळून सगळेजण प्रचंड कष्ट घेऊन प्रयोग करतो. कोकणात सहकार नाही म्हणतात; मात्र माझ्या मते आमची टीम ही कोकणातील सहकाराचे उत्तम उदाहरण आहे.

पहाटे ५ ला कार्यक्रम
कोकणात, मुंबईसारख्या शहरात मिळून आजपर्यंत ४५३ प्रयोग झाले. मुलुंड येथे ९८ व्या नाट्य संमेलनात प्रयोगाची संधी मिळाली. सलग ६० तास कार्यक्रम सुरू होते. आम्हाला पहाटे ५ वा. संधी मिळाली; मात्र कार्यक्रम पाहून रसिक खूश झाले. रसिक आणि सेलिब्रिटी यांनी आमच्या कलाकारांसोबत फोटो घेण्यासाठी रांग लावली होती. हा आमचा मोठा सन्मान होता. अनेक संस्थांच्या शाळांच्या मदतीसाठी कार्यक्रम केले. लवकरच ५०० व्या प्रयोगाचा मोठा कार्यक्रम होईल. यावर्षी मला नाटा परिषदेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांच्या हस्ते मिळाला, असे बेंडखळे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow