एस.टी. महामंडळ आधुनिक तयार बसेस ताफ्यात घेणार

Aug 30, 2024 - 14:12
Aug 30, 2024 - 14:31
 0
एस.टी. महामंडळ आधुनिक तयार बसेस ताफ्यात घेणार

मुंबई : बस बांधणीसाठी लागणारा वेळ आणि जादा खर्च, अतिरिक्त मनुष्यबळ, असलेल्या जुन्या मशिनरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव या कारणांमुळे एस.टी. महामंडळाने तयार बस ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वमालकीच्या बसपेक्षा कंत्राटदाराकडून घेतलेल्या बस आधुनिक असल्याने त्या प्रवाशांच्या पसंतीला उतरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एस.टी. महामंडळाच्या इतिहासात आतापर्यंत चेसिस म्हणजे सांगाडा खरेदी करून त्यावर मध्यवर्ती कार्यशाळेत बसची बांधणी होत असे. परंतु, सध्या मध्यवर्ती कार्यशाळेत नवीन बस बांधणीचा खर्च तुलनेने जास्त आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाने पहिल्यादाच तयार नवीन साध्या दोन हजार २०० आणि ५ हजार १५० ई- बस घेण्याचा निर्णय घेतला. बस लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महामंडळाने प्रथमच थेट तयार बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. यापूर्वी २००७ साली महामंडळाने तयार २५० मिनी बस घेतल्या होत्या.

कार्यशाळेत वेळही जास्त, आकर्षकतेचीही कमी
एस.टी. महामंडळाच्या राज्यात तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. दापोडी (पुणे), चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर), हिंगणा (नागपूर) येथे या कार्यशाळा आहेत. कार्यशाळेत बसची बांधणी केली जाते. महामंडळाकडे बस बांधणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान नाही. जुन्या मशिनरी असल्याने एक बस बांधणीसाठी जास्त मनुष्यबळ लागते. त्यातच एका चेसिसवर बस बांधणीसाठी सुमारे दीड दिवसाचा कालावधी लागतो. खासगी बसच्या तुलनेत महामंडळाने स्वतः बांधलेल्या बस या फारशा आधुनिक नसतात. तसेच या बसचा लूकदेखील काही खास नसतो, त्यामुळे महामंडळाने स्वतः बांधलेल्या बसबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात.

त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान 
महामंडळाने काही महिन्यांपूर्वी सध्या ५०० बस खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. या बस आधुनिक, पुश बँक आसन व्यवस्था, मोठ्या खिडक्या, आकर्षक रंगसंगती असणाऱ्या आहेत. त्यामुळे या गाड्या प्रवाशांच्या पसंतीला उतरल्या आहेत. खासगी बस बांधणी करणाऱ्या कंपन्यांकडे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असते. त्यामुळे अतिशय कमी कालावधीत या बस बांधल्या जातात. सध्या बसचा प्रचंड तुटवडा भासत असल्याने कमीत कमी वेळेत बस महामंडळाला मिळाव्यात, या हेतूने तयार बसला प्राधान्य देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow