चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी मेळाव्यात प्रशांत यादव यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Jul 3, 2024 - 09:37
Jul 3, 2024 - 10:57
 0
चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी मेळाव्यात प्रशांत यादव यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चिपळूण : शेतकऱ्यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देताना भाजीपाला व्यवसाय व चारा जोडधंदा म्हणून केला तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकऱ्यांबरोबरच महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे, असे प्रतिपादन वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी मेळावा प्रसंगी केले.

हा मेळावा चिपळूण नागरीच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात पार पडला. यावेळी वाशिष्ठी डेअरीतर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका स्मिता चव्हाण, अॅड. नयना पवार, संचालक अशोक कदम, सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, रवींद्र भोसले, जलयुत शाहनवाज शाह, दीक्षा शिंदे, उदय गांधी, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस आदी उपस्थित होते. 

चिपळूण पंचायत समितीमधील चिपळूण तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर यांनी कृषी विषयक माहिती देताना म्हणाले, शेतीबरोबरच परसबाग लागवडी, दुग्ध-कुक्कुट, शेळीपालन व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. शेती उत्पादनाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शेतकऱ्यांनी कृषी प्रशिक्षणाकडे वळले पाहिजे, यातून आपल्याला कृषीविषयक माहिती मिळेल, याचा उपयोग शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी होऊ शकतो, असे मार्गदर्शन काटकर यांनी केले.

दापोली कृषी विद्यापीठातील भाजीपाला लागवड विशेषज्ञ डॉ. बी. पी. सानप यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भाजीपाला दैनंदिन आहाराचा अविभाज्य घटक आहे. दररोजच्या आहारात भाजी सेवन करणे महत्त्वाचे आहे. तळ कोकणात २५ ते ३० टक्के भाजीपाला लागवड होते. यामध्ये वाढ व्हायला हवी. भाजीपाला व्यवसायाची सुरुवात परसबागेतून करायला हवी. भारत हा भाजीपाला उत्पादनांमध्ये चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला लागवडीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो असे मार्गदर्शन डॉ. सानप यांनी यावेळी केले, तसेच कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल अहिरे यांनी मृद व कृषी विषयी माहिती दिली. तर जलदूत शाह यांनी देखील जल व कृषी या विषयावर काम करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. सामूहिक शेतीचे प्रयोग झाले पाहिजेत. पर्यटन वाढीसाठी देखील काम व्हायला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याला खेर्डी ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया उतेकर, ज्येष्ठ व्यापारी श्रीराम रेडीज, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई, रमण डांगे, नितीन यादव, सतीश कदम, अंजली कदम, रुई खेडेकर, दीक्षा शिंदे, परिवर्तन संस्थेच्या शामल कदम, गणपत शिंदे, सारिका पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow