लांजा : बेनिखुर्द ग्रामस्थांना मिळणार दोन दिवसांत पाणी

Sep 2, 2024 - 11:13
 0
लांजा : बेनिखुर्द ग्रामस्थांना  मिळणार दोन दिवसांत पाणी

लांजा : संग्रहित ऐन पावसाळ्यात महिनाभर पाण्यावाचून हैराण झालेल्या बेनीखुर्द बौद्धवाडीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीवर धडक देऊन याबाबत जाब विचारला. भर ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासमोर प्रश्नांची खैरात करून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व्यवस्थापन विरोधात चांगलेच खडसावले. निरुत्तर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांसमोर अखेर नमते घेत दोन दिवसात नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. लेखी आश्वासन घेतल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. ग्रामपंचायत मूलभूत नागरी सुविधांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले असल्याचा हल्ला बेनिखुर्द बौद्धवाडीच्या नागरिकांनी ग्रामसभेत केला होता. उशाला धरण आणि घशाला कोरड अशी परिस्थिती लांजा तालुक्यातील बेनिखुर्द बौद्धवाडी येथील नागरिकांची झाली आहे.

महिनाभर वीस घरांना पावसात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही ग्रामपंचायत नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील बेनिखुर्द-खेरवसे या ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत नळपाणी योजना राबवली गेली आहे. पाण्याची मोटर जळल्याने महिनाभर ग्रामपंचायतीचे पाणी नियोजन विस्कळीत झाले आहे. बेनिखुर्द गावामध्येच मोठे धरण असून धरण पातळी क्षमता पूर्ण भरली आहे. मात्र उशाला धरण आणि घशाला कोरड अशी परिस्थिती बेनिखुर्द गावातील बौद्धवाडी येथील नागरिकांची झाली आहे. बौद्धवाडीला पाणीपुरवठा करणारी पाण्याची मोटारची बंद पडल्याने गेले महिनाभर येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. एक महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे. वस्तीपासून दूरवर असणाऱ्या एका विहिरीवरून महिनाभर महिलावर्ग पाण्यासाठी पायपीट करत आहेत, तर कधी खासगी बोअरवेलमधून पाणी विकत आणत आहेत. ग्रामपंचायतीला अनेकवेळा प्रत्यक्ष भेटून पाणी प्रश्न सोडवा, अशी विनंती येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने आज करू, उद्या करू, अशी आश्वासने दिली; मात्र एक महिना उलटला तरी अद्यापही नागरिकांना ग्रामपंचायतीचे पाणी मिळालेले नाही.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आली जाग...
नागरिकांच्या पाणी प्रश्नांकडे गांभीयनि लक्ष देत नसल्याने नागरिकांनी या ग्रामपंचायतीवर धडक दिली. भर ग्रासभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना चांगलेच धारेवर धरले. महिनाभर पाण्यावाचून नागरिक हैराण झाले असून पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला. महिनाभर केवळ आश्वासन देणाऱ्या ग्रामपंचायतीने नागरिकांपुढे नमते घेत पाणी दोन दिवसात दिले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र नागरिकांनी हे आश्वासन लिखित स्वरूपात मिळावे, अशी मागणी केली. लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर ग्रामस्थांचा राग शांत झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow