चिपळूणातील सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्यांची मोडतोड

Sep 3, 2024 - 10:44
Sep 3, 2024 - 11:16
 0
चिपळूणातील सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्यांची मोडतोड

चिपळूण : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या प्रेक्षागृहातील खुर्च्यांची मोडतोड झाल्याचा प्रकार उघड झाला असून, गेल्यावर्षी १५ ऑगस्टच्या सुमारास करोडो रुपये खर्च करून सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण झाल्यानंतर हळूहळू सांस्कृतिक केंद्राच्या छप्परासह प्रेक्षागृहातील व अन्य ठिकाणची दुरवस्था होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येऊ लागले आहे.

२००५ च्या महापुरानंतर सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था झाली. त्यानंतर दहा ते पंधरा वर्षे सांस्कृतिक केंद्र दुरूस्ती करण्याच्या राजकीय वादातच गेली. अखेर लोकक्षोभ वाढल्याने शासनाच्या विशेष निधीतून करोडो रूपये खर्चाच्या सांस्कृतिक केंद्र दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, हे काम देखील दर्जावरून वादात सापडले, त्या संदर्भात तत्कालीन सभागृहातील सुमारे ५० टक्क्याहून अधिक सदस्यांनी सांस्कृतिक केंद्राच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्यासह कामाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या. तक्रारीदरम्यान सांस्कृतिक केंद्राच्या आसन व्यवस्थेसाठी घेण्यात आलेल्या खुर्चा व त्याचा दर्जा तसेच प्रती खुर्ची केलेला खर्च हा विषय राजकारणापासून समाजकारणापर्यंत जोरदार गाजला. तक्रारदारांनी शहरातून मिरवणूक काढत यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगून खुच्र्याचा दर्जा व रक्कम यामध्ये तफावत असल्याचे तक्रारीतून निदर्शनास आणले. मात्र, या सर्व तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गतवर्षी केंद्राचा मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच एका जादूच्या प्रयोगावेळी केंद्रातील सुशोभित केलेल्या छताची फळी पडून कामाचा दर्जा उघड झाला. त्यानंतर सांस्कृतिक केंद्राच्या छतावरील पत्र्यांची पावसामुळे झालेली दुरवस्था अनेकांनी निदर्शनास आणली. त्यावेळी लोकार्पण सोहळ्यादरम्यान छताला गळती लागू नये म्हणून प्लास्टिक कापडाचा छतावर वापर करण्यात आला. लोकार्पण झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीत हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच व्यावसायिक कार्यक्रम झाले. मात्र, त्यापेक्षा जास्त कार्यक्रम गेल्या वर्षभरात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या नावाखाली घेण्यात आले.

दरम्यान न.प. प्रशासनाने छताची गळती थांबविण्यासाठी नव्याने पत्रे वसविले तर कामाच्या दरम्यान अंतर्गत त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीत या केंद्रात खासगी कार्यक्रमांचीच रेलचेल जास्त असल्याचे दिसून येते. दरम्यान सुरुवातीपासून या खुर्च्याची दर्जाबाबत व्यक्त होणारी शंका हळूहळू उघड होऊ लागली, महिन्या-दोन महिन्यातच खुर्च्याची  मागील रांग खिळखिळी झाली तर दोन दिवसांपूर्वी प्रेक्षागृहातील अनेक खुर्च्याची पूर्णपणे मोडतोड झाल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रेक्षागृहात अनेक ठिकाणी तंबाखू, गुटखा खाऊन पिचकाऱ्या टाकल्याने अस्वच्छता दिसून आली. एकूणच पुन्हा एकदा सांस्कृतिक केंद्राची वाटचाल दुरवस्थेकडे होक लागली असून त्याला वेळीच आळा घालण्यासाठी न.प. प्रशासनाने कठोर कारवाईसह कडक बंधने अंमलात आणण्याची गरज आहे. दरम्यान, सांस्कृतिक केंद्र चालविणे व खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यास देण्याबाबत प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली असली तरी त्यावर न.प.चा अंकुश राहणे गरजेचे आहे. केंद्रातील एक दालन प्रशासनाने सध्या नाट्य परिषद शाखेसाठी वापरण्यास दिले आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता करोडो रूपये खर्च करून सुशोभिकरणाचा मुलामा दिलेल्या केंद्राच्या नूतनीकरण कामाच्या दर्जा व आर्थिक खर्चाबाबत संशय व्यक्त होण्यास मोडलेल्या खुर्च्यावरून सुरुवात झाली आहे.

कार्यक्रमानंतर झाली नासधूस
चिपळूणात रविवारी (दि.१) सांस्कृतिक केंद्रात एकाच दिवशी तीन कार्यक्रम झाले. यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अध्यक्षांच्या उपस्थितीत सकाळी मेळावा होता. यानंतर सायंकाळी ५ वा. रोटरी क्लबच्या माध्यमातून वाद्य संगीताचा कार्यक्रम, रात्री गवळी समाजाच्या वतीने शक्ती- तुरा जाखडी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी केंद्रातील खुच्याँची मोडतोड झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow