रत्ननगरीत युवा गायकांचे 'स्वरस्नेह' मैफलीत शास्त्रीय गायन

Jun 5, 2024 - 10:57
 0
रत्ननगरीत युवा गायकांचे 'स्वरस्नेह' मैफलीत शास्त्रीय गायन

रत्नागिरी : ज्येष्ठ संगीत समुपदेशक, संगीतकार वर्षा भावे यांचे शिष्य रोहन देशमुख आणि शुची तळवलकर (मुंबई) यांच्यासह येथील विनया परब यांचे शिष्य तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर यांच्या बहारदार शास्त्रीय गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वरस्नेह' मैफलीचे.

शास्त्रीय गायन शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, तसेच शास्त्रीय गायनाची गोडी युवा पिढीला लागावी याकरिता कलांगण आणि स्वराभिषेक या संस्थांचे शिष्यवर्ग मुंबई आणि रत्नागिरी येथे ही मैफल सादर करतात.

या उपक्रमातील ही चौथी मैफल 'स्वरस्नेह' मैफलीत शास्त्रीय गायन करताना रोहन देशमुख, उत्तरा केळकर, शुची तळवलकर आणि तन्वी मोरे. परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर पार पडली. रोहन देशमुख याने मुलतानी रागातील विलंबित एकतालात बद्ध "ओ रब्बा मेधीयों" या बडाख्यालाने मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अब मानत नाही जियारा मोरा तूम बिन हा छोटा ख्याल आणि त्याला जोडून एक तराणा, त्यानंतर उत्तरा केळकर हिने बिहाग रागातील दुर्गे महारानी, तर शुची तळवलकर हिने मारुबिहाग रागातील "परी मोरी नाव मजधारा रे दाता" ही बंदिश सादर केली. तन्वी मोरे हिने जयजयवंती रागातील आणि झुमरा तालात बद्ध "ए लरा माई सजनी" हा बडाख्याल, त्याला जोडून "झनन झनन बाजत पायल मोरी" हा छोटा ख्याल सादर केला.

तन्वीने विदुषी अलकाताई देव-मारुलकर यांनी बांधलेली "अखियन कल ना पर माई" ही मिश्रपिलू रागातील ठुमरी सादर करून मैफलीची सांगता केली, मैफलीचे निवेदन दीप्ती आगाशे यांनी केले, तर तबलासाथ प्रथमेश शहाणे, पुष्कर सरपोतदार आणि केदार लिंगायत, संवादिनीसाथ मंगेश मोरे आणि तानपुरासाथ मीरा सोवनी, ईशानी पाटणकर आणि ऋता पाटणकर यांनी केली.

मैफलीदरम्यान रत्नागिरीतील ज्येष्ठ संगीत शिक्षिका उज्वला पटवर्धन यांना वर्षा भावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. मैफलीला प्रसिद्ध संवादिनीवादक अनंत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर, स्वराभिषेकचे विद्यार्थी, पालकांसह संगीतप्रेमी उपस्थित होते. राकेश बेर्डे यांनी ध्वनिसंयोजन केले, तर गगनगिरी महाराज आश्रमाचे राम पानगले यांनी मोलाचे सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow