'चारशेपार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला; 'सामना'तून हल्लाबोल

Jun 5, 2024 - 11:27
 0
'चारशेपार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला; 'सामना'तून हल्लाबोल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) निकाल लागले आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर एनडीएनं (NDA) बहुमताचा आकडा ओलांडला आहे, पण भाजप (BJP) स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, असं दिसत नाही. निवडणूक निकालांनुसार, एनडीए 291 जागांसह आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडीला (India Alliance) आतापर्यंत 234 जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप 400 चा आकडा पार करण्याचा दावा करत होतं, याउलट इंडिया आघाडी मोठ्या राज्यांमध्ये आपला प्रभाव पाडताना दिसलं. 

देशभरातील इंडिया आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर सामना अग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा 'चारशेपार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले, चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले.

नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकले गेले. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी-शहांनी भारतीय जनता पक्षाचे 'वॉशिंग' मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून 'आयेगा तो मोदी हीं' हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकांचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर नरेंद्र मोदी करणार आहेत काय? भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व तथाकथित 'एनडीए'च्या बहुमताचा आकडा काठावर आहे. म्हणजे 'चारशे पार'च्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदी यांना टायर पंक्चर झालेल्या रिक्षात बसून रायसिना हिलवर फिरावे लागेल. देशाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ज्या उत्तर प्रदेशात राममंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपास सगळ्यात मोठा हादरा बसला आहे.

भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला-

उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 40 जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकत्याने केला, रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा 'धो-धो' पाऊस 'मिंधे' सेनेने पाडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शहांनी मिळून महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या, पण हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्रात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या काही हक्कांच्या जागेवर अपयश आले.

शिवसेनेने विषम परिस्थितीत संघर्ष केला-

अर्थात शिवसेनेने विषम परिस्थितीत संघर्ष केला, पक्ष गेला, चिन्ह गेले, आर्थिक ताकद नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेने दोन आकड्यांत जागा जिंकल्या, महाविकास आघाडी म्हणून ३० जागा जिंकणे हा धनशक्ती व सरकारी यंत्रणेचा पराभव आहे. केरळ, प. बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ही राज्ये भाजपच्या पाठीशी राहिली नाहीत. तामीळनाडूने तोच मार्ग स्वीकारला. आंध्रात जगनमोहन रेड्डी व त्यांचा पक्ष पराभूत झाला. तेथे तेलुगू देसम व चंद्राबाबूंनी उसळी मारली. कर्नाटक, बिहारात 'इंडिया' आघाडीस अपेक्षित यश मिळाले नाही. ते मिळाले असते तर 'इंडिया' आघाडीला बहुमताचा आकडा सहज पार करता आला असता. तसे घडले नाही तरीही मोदींच्या अहंकाराचा रथ चिखलात अडकला. मोदी व त्यांचे लोक तिसऱ्यांदा दिग्विजय प्राप्त करतील असे नगारे वाजवणारे आता थंड पडले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पन्नास जागाही मिळणार नाहीत अशा वल्गना करणाऱ्यांचे दात घशात गेले. मोदी यांचे तथाकथित देवत्वाचे पितळ उघडे पडले. दिल्लीत पुढे काय होणार, हा प्रश्न महत्त्वाचा. अल्पमतातल्या 'एनडीए'चे नेतृत्व स्वीकारून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला पुढे जातील काय? सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow