सार्वजनिक कार्यक्रमात वीजसुरक्षेला प्राधान्य द्या : महावितरण
रत्नागिरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन काहीच दिवसांत होणार असून, येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात तसेच घरगुती वीजपुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवासाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी याकरिता गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
वीज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजपुरवठ्याच्या वीजदरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीज जोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे. या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी, गणेशोउत्सवात, नवरात्रोत्सव अशा उत्सवात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युततारा आणि खांबांना स्पर्शा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा
आपत्कालीन स्थितीत गणेश मंडळांनी महावितरणला संपर्क साधावा. याकरिता संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत, आपत्कालीन स्थितीत महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्र. १९१२/१८००- २९२-३४३५/१८००-२३३-३४३५ येथे संपर्क साधावा, असे महावितरणतर्फे आवाहन केले आहे.
अशी घ्या काळजी
वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित झाल्याने प्राणांतिक अपघात होतात. जवळच्या वीजखाबावरून किंवा वीजवाहिन्यांवरून अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये. यामुळे जीवित व वित्तहानीचा संभाव्य धोका अधिक आहे. वीजजोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. ठिकठिकाणी जोड असणारी किंवा तुटलेल्या किंवा लूज वायर वापरू नयेत. वायरीस जोड देण्यास प्रमाणित इन्सुलेशन टेप वापरावी, भक्तांच्या सुरक्षेच्या कारणास्तव गणेश मंडळांनी वीजसुरक्षा उपाययोजनांबाबत तडजोड करू नये.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 04/Sep/2024
What's Your Reaction?