शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे लक्ष द्या : शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत
सावर्डे : शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींच्या सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी निर्णय घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अलीकडच्या काळात घडलेल्या काही अनुचित घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपायोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी, तसेच काही नवीन उपाययोजना अधिक चांगल्या पद्धतीने लागू करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) सुवर्णा सावंत यांनी केले.
सावर्डे येथील भाऊसाहेब महाडिक सभागृहात 'विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिला सुरक्षा' या विषयावर मुख्याध्यापकांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. सावंत म्हणाल्या, 'जिल्ह्यातील सर्व शाळांमधीत विद्यार्थी-विद्यार्थिनीना सर्वतोपरी सुरक्षा मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, शाळांमध्ये तक्रारपेटी बसवणे, सखी सावित्री समितीच्या तरतुदींचे पालन करणे, परिवहन समिती स्थापन करणे, विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठित करणे व योग्य पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
या प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक शैलजा बोबडे-सावंत यांनी विद्यार्थिनी व महिला सुरक्षेविषयी मार्गदर्शन करताना कोणत्याही अडचणीच्यावेळी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. पोलिस सदैव तुम्हाला मदत करतील, असा विश्वास त्यांनी दिला तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन पुरळकर यांनी सायबर क्राईम गुन्हे कसे घडतात, मोबाईलच्या माध्यमातून कसे अडकले जातो या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी नरेन गावंड, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व जिल्ह्यातील ३५०हून अधिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत काकडे व शिवलिंग सुपणेकर यांनी केले.
दामिनी पथकाची अशी होते मदत
सहायक पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी पीपीटीद्वारे महिला व विद्यार्थिनी सुरक्षा, याविषयी मार्गदर्शन केले, संकटकाळात पोलिसमित्र यांच्याशी संपर्क साधण्यासाठी असलेले हेल्पलाइन नंबर तसेच गुन्हे कसे घडतात आणि त्यांना दामिनी पथक कशी मदत करते, याविषयी सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 05/Sep/2024
What's Your Reaction?