अमेरिकेतील बाप्पाच्या डोक्यावर रत्नागिरीच्या बनेंचा फेटा!

Sep 6, 2024 - 10:53
 0
अमेरिकेतील बाप्पाच्या डोक्यावर रत्नागिरीच्या बनेंचा फेटा!

रत्नागिरी : लाडका गणपती बाप्पा अधिक खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो.

रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या सहज अॅडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली आहे. तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे.

रत्नागिरीतील कर्ला या गावात राहून फेटे बांधणीचा आपला छंद जोपासणाऱ्या महेश बने यांनी आपल्या कामात नेहमीच वैविध्य ठेवले. त्यांनी पुढे जाऊन गेली काही वर्षे गणपतीला फेटे बांधून देण्याचे काम सुरू केले. मूर्तीच्या मापानुसार हे फेटे बांधले जात. आता त्याही पुढे जाऊन या फेट्यात अधिक सुलभता आणत त्यांनी अॅडजस्ट होणारे फेटे तयार केले असून रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असलेला हा फेटा आता थेट अमेरिकेत पोचला आहे. अमेरिकेतील मिशिगन इथे राहणाऱ्या नेहा सावंत कुर्डे यांना सोशल मीडियावरून बने यांच्या फेट्याची माहिती मिळाल्यावर सावंत कुटुंबाने या फेट्याची मागणी केली आहे. गणेश चतुर्थीला त्यांच्या घरातील बाप्पाचे रूप बनेंच्या फेट्यामुळे यावर्षी अधिकच खुलणार आहे.

फेटे बांधणीबरोबरच आता गणपती, कृष्ण, जोतिबा इत्यादी मूर्तींना धोतर, पोशाख किंवा अंगरखा ही घालून देतात. महेश बने यांनी दिलेल्या माहितीनुसार छंद म्हणून सुरू केलेला व्यवसाय आता त्यांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. भविष्यात गणपतीच्या मूर्ती विकत घेऊन त्यांना संपूर्णपणे सजवून त्या विकायच्या, असा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे अलीकडेच आगवे गावाची पालखी आली होती, तर त्या संपूर्ण पालखीला फेटा बांधून किमया केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow