मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

Sep 10, 2024 - 12:30
 0
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

जालना : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता.

मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

राजेंद्र राऊतांवर जरांगेंची टीका

गेल्या काही दिवसांपासून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वाकयुद्ध सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतल्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरुन जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांना इशारा दिला. ते रक्त सांडेल म्हटले. मला थेटला तर मी सोडत नाही. मराठ्यांच्या शक्तीपुढे कोणाची दादागिरी चालणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले होते. मात्र, दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातील वाकयुद्धाला धार चढताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow