किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह.. महाराजांना वंदन करण्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी

Jun 6, 2024 - 09:38
 0
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह.. महाराजांना वंदन करण्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी

रायगड : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Din) राज्यभरात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहेत. ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे.

या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. तसेच, अनेक शाहीर कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. एकूणच किल्ले रायगडावर वातावरण अगदी शिवमय झालं आहे.

या सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल झाल्या आहेत. अनेक समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. गडावर 5 लाखांहून अधिक शिवभक्त दाखल होणार आहेत. होळीच्या माळावर ढाल तलवाराची मैदानी खेळाची होणार प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. खबरदारी म्हणून प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालं आहे. या भव्य सोहळ्यासाठी 3 महिन्यांहून अधिक वेळ तयारी सुरू होती. राज्यभरातून अनेक समित्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमासाठी दाखल होणार आहेत.

शिवभक्तांना पोलीसांचं आवाहन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात. त्या निमित्ताने पोलीस प्रशासनाकडूनही संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे रायगडावर रोपवे असून त्यासाठी मर्यादा आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनी फक्त प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच ही रोपवेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच इतरांसाठी नानेदरवाजा खुला राहणार आहे.

खबरदारी घेणं महत्त्वाचं - पोलीस प्रशासन

दरम्यान जर गडावर गर्दी झाली तर स्वयंशिस्त पद्धतीने जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचे पालन करणे गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याभिषेकाचा दिन हा सर्वांचा उत्साह वाढणारा दिवस असून सकाळीच कोणी येण्याचा अट्टाहास करु नये असं आवाहनही पोलीस प्रशासनाने केलं आहे. त्यामुळे यंत्रणा जरी तयार असली तरीही खबरदारी घेणं महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

सार्वभौम राज्याची स्थापना

‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आलं. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली.

सर्पदंश किंवा विंचूदंशापासून सुरक्षितेसाठी सर्पमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उष्णतेचा विचार करता गड परिसरात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम व भोजनव्यवस्था असून, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रक्षेपण सर्व वाहिन्या व सोशल मीडियावर उपलब्ध करण्यात येणार आहे. गड परिसरात एलपीडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

या सोहळ्यासाठी सुमारे 150 पोलिस अधिकारी आणि एक हजार 600 कर्मचारी, चार वाहतूक पोलिस अधिकारी आणि 159 कर्मचारी, एसआरपी, एसबीआर, रायगड पोलिस दंगलनियंत्रण पथक, स्थानिक बचाव पथक आणि स्वयंसेवक हजर असणार आहेत. यासाठी बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. या सर्वांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 06-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow