ड्रोन टप्प्यात आले की एका गोट्यातच खाली पाडतो; टेहळणीच्या प्रकारावर जरांगेंची प्रतिक्रिया

Jul 2, 2024 - 16:20
 0
ड्रोन टप्प्यात आले की एका गोट्यातच खाली पाडतो; टेहळणीच्या प्रकारावर जरांगेंची प्रतिक्रिया

जालना : ड्रोन टप्प्यात येत आले की एका गोट्यात खाली पाडतो आम्ही, असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील घराची टेहळणी प्रकार समोर आल्यानंतर दिला.

तसेच तुम्ही कितीही बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मी मागे हटणार नाही, तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही, मला मॅनेज करू शकत नाही. त्यामुळेच हे असे प्रयोग सुरू असतील अशी शंका देखील जरांगे यांनी व्यक्त केली.

अंतरवाली सराटी गावात आणि मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या परिसरात ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारची तक्रार ग्रामस्थांनी पोलिसांत केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे अनेक दिवसापासून चालू आहे. व्हिडिओ बनवायचे समाजात गैरसमज पसरवायचा. मी काही मॅनेज होत नाही. मराठ्यांसाठी मरण्यास तयार, मात्र मागे हटणार नाही. ओबीसी व मराठा बांधवात आम्ही वाद विवाद होऊ देणार नाही. कोणीतरी बाहेरचा माणूस जाणूनबुजून वाद निर्माण करत आहे. येथील कोणीच अशा गोष्टी करू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले.

गोरगरीब मराठा समाजाचे पोरं मोठे व्हावे यासाठी मी लढतोय. आता ही वेळ आहे, मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. तसेच जर ओबीसी समाज ताकदीने एकत्र येऊ शकतो तर आता मराठ्यांनी या शांतता रॅलीत एकत्र यावे. येवलावाला राजकीय फायद्यासाठी हे करतो आहे. ओबीसींचे नेते येवलावाल्याने एकत्र केले. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावं, हीच वेळ आहे. आपली शांतता रॅली निघणार आहे, त्यासाठी हा विरोध असल्याचेही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या
२६ जूनपासून ड्रोनने टेहाळणी सुरू आहे. याबाबत गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना तोंडी तक्रार दिली आहे. यासंदर्भात त्यांनीही पाहणी केली. सोमवारी ही पुन्हा ड्रोनने अंतरवाली गावात व माझ्या मळ्यात टेहाळणी केली. याबाबत गोंदी पोलिसांना कळवले आहे. त्यांची गाडी ही रात्री आली होती. याबाबत गोंदी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार देणार आहे. झालेला प्रकार पाहता मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास यावी, अशी मागणी जरांगे यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow