संगमेश्वर : वांद्री येथील संकेत पाताडेची एकाच वेळी ठाणे, कोल्हापूर पोलीस दलात निवड

Sep 13, 2024 - 12:14
 0
संगमेश्वर : वांद्री येथील संकेत पाताडेची एकाच वेळी ठाणे, कोल्हापूर पोलीस दलात निवड

◼️ पंकज ठीक, मनस्वी मांजरेकरचाही सत्कार

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील संकेत सुनील पाताडे याची ठाणे पोलीस आणि कोल्हापूर येथील सीआरपीएफ दलात निवड झाल्याने गावात सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवार 9 सप्टेंबर रोजी त्याचे वांद्री येथे आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर याच गावातील पंकज रवींद्र ठीक याची  महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पदी निवड झाल्याबद्दल तसेच वांद्री येथील परंतु मुंबई स्थित मनस्वी संदीप मांजरेकर हीने राष्ट्रीय खेळ आणि कराटे संघ मुंबई उपनगर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि कांस्य पदक पटकावल्याबद्दल आणि पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी झाल्याबद्दल तिघांचेही ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतबाजीत मिरवणुकीने जंगी स्वागत करण्यात आले. 

या सत्कार प्रसंगी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकर, मान मानकरी, मुंबई ग्रामस्थ मंडळ, तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, विविध मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संकेत, मनस्वी आणि पंकज यांचा कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संकेत आणि पंकज यांना या पदापर्यंत पोहोचवण्यात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अभिषेक मयेकर यांचाही सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार प्रसंगी संकेत याने आपल्या आई वडील आणि आजी आजोबांमुळे या पदापर्यंत पोहोचलो असे सांगितले.

कार्यक्रमावेळी बोलताना संकेत याने आपल्या खडतर मेहनतीचा प्रवास उलगडला. वडिलांचे ऑपरेशन असतानाही त्याला पोलीस भरतीसाठी जावं लागलं हे सांगताना त्याला अश्रू अनावर झाले. 2020 पासून तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. त्याने पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढी मेहनत घेण्याची जिद्द बाळगली होती. ज्या जिल्ह्यात पोलीस भरती, आर्मी भरती असेल त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. 2022 साली आर्मी भरतीतून मेडिकल मधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्याने. 2023 साली कोल्हापूर येथे प्रयत्न केला मात्र तिथेही केवळ एका मार्कने बाहेर पडावे लागले. यामुळे तो निराश झाला. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. आणखी मेहनत घेऊन उतरायचे त्याने ठरवले. त्याने अभ्यासावर भर दिला. त्याच वर्षी मुंबई पोलीस दलातून भरतीला उतरला तिथेही 4 मार्कने त्याला दगा दिला.तिथे त्याला यशाने हुलकावणी दिली. आपली मेहनत कुठेतरी कमी पडतेय याने तो खचला होता. तेव्हा अभिषेक मयेकर याने ‘तू यश मिळेपर्यंत मेहनत घेत रहा’ अशी त्याला उभारी दिली आणि त्या उभारीने तो पुन्हा उभा राहिला. अखेर यशाला ही त्याच्या जिद्दी समोर झुकावं लागलं. 2024 मध्ये त्याला एकच नव्हे तर कोल्हापूर आणि ठाणे अशा दोन ठिकाणी भरतीत निवड होऊन त्याला भरभरून दान मिळालं. त्याच्या यशाचं फळ मिळाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला. अभिषेक मयेकरने त्याला पोलीस मध्ये सिलेक्शन झाल्याची माहिती देताच त्याचा विश्र्वासच बसत नव्हता. शेवटी त्याने स्वतः चेक केल्यानंतर तो हर्शोलासित झाला. त्याने ठाणे पोलीस भरतीत मैदानी 50 पैकी 45 गुण तर लेखी मध्ये 100 पैकी 92 गुण मिळवले. तर कोल्हापूर सीआर पी एफ भरतीत मैदानी 100 पैकी 95 गुण व लेखी परीक्षेत 100 पैकी 88 गुण संपादन करून दोन्ही ठिकाणी यशश्री खेचून आणली होती.

मनस्वी मांजरेकरच कौतुक

दरम्यान मनस्वी संदीप मांजरेकर हीने  ४० व्या महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियन स्पर्धेत १४ वयोगटात गोल्डन किक मारत सुवर्ण पदक पटकावले तसेच काथा प्रकारात ब्राँझ पदक पटकावले. 2024 मध्ये तिने तीन सुवर्ण पदक आणि तीन कांस्य पदक मुंबई येथे पटकावली आहेत. राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कराटे मध्ये स्व संरक्षण घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे मनस्वी हीने कराटे मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 13-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow