संगमेश्वर : उमरे धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल तयार

Jul 20, 2024 - 11:44
 0
संगमेश्वर : उमरे धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल तयार

संगमेश्वर : तालुक्यातील उमरे धरणाच्या दुरुस्तीचा अहवाल तयार केला असून, तो नाशिक येथील जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालयाकडे जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष काम चालू केले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा गाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले.

दहा गावांतील ग्रामस्थांच्यावतीने महेंद्र जाधव, राजू तांबे, हनीफ वलेले, प्रियंका जाधव, सत्यवान विचारे आदीसह सहभागी असलेल्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांची भेट घेऊन धरणाच्या दुरुस्तीबाबत केलेल्या कार्यवाहीवर चर्चा केली. संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणावर परिसरातील दहा गावे अवलंबून आहेत. गेली तीन वर्षे या धरणाला गळती लागल्यामुळे येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवूनही कोणतीच हालचाल होत नाही. ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर तत्कालीन खासदार विनायक राऊत यांनी अधिकाऱ्यांसह धरणाला भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशासनाला सक्त सूचना करून राज्यशासनाला तत्काळ अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या.  

माजी खासदार राऊत यांच्या सूचनेनुसार, पुणे येथून वरिष्ठ वैज्ञानिकांच्या पथकाने पाहणी केली. त्या वेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्या. त्या धरणाची तात्पुरती डागडुगी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी पावसाळ्यात धरणात पाणीसाठा करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सध्या धरणाला कालवा काढून धरणातील पन्नास टक्के पाणीसाठा कमी करण्यात आला आहे. या धरणाचे लवकरात लवकर काम व्हावे म्हणून तेथील स्थानिक आमदार शेखर निकम हे वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत आहेत तसेच आमदार असल्ल्म शेख यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात कपात सूचना मांडण्यात आली. त्याप्रमाणे विरोधी पक्ष नेता बडेड्डीवार यांच्या कार्यालयाकडूनही जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेण्यात आली.

धरण दुरुस्तीविषयी वरिष्ठ पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, धरणाचे काम नक्की केव्हा सुरू होणार, काम सुरू केल्यानंतर उर्वरित कालावधीत येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार का, याबाबत माहिती घेण्यासाठी येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. १८) पाटबंधारे विभागात जाऊन कार्यकारी अभियंता सलगर यांची भेट घेतली.

कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलसंधारण विभागाकडून धरणासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. याबाबतचा अहवाल बनवण्यात आला असून नाशिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तेथून मंजुरी आल्यानंतर लवकरच मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. तिथून मंजुरी आली की, प्रत्यक्ष काम चालू होईल, हे काम वेगाने करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार
धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत कसलीही अडचण येणार नाही, तशी आखणी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणातील गाळ काढण्यासंदर्भात्त तत्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे सलगर यांनी ग्रामस्थांना सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow