Ratnagiri : जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थिनी सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजनांची अंमलबजावणी

Sep 16, 2024 - 15:22
 0
Ratnagiri : जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थिनी सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजनांची अंमलबजावणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. शाळास्तरावर काटेकोर अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागामार्फत सूचना देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांमार्फत दररोज शाळानिहाय आढावाही घेत आहेत. अंमलबजावणी न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जि.प. प्रशासनाने दिला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबींची शासन स्तरावर गंभीर दखलही घेण्यात येत आहे. वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने या उपाययोजनांशी तडजोड करता येणार नाही. शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. या तरतुदीचे पालन न करणार्‍या शाळांच्या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे.

शाळेतील नियमित कर्मचार्‍यांबरोबरच बाह्याद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात त्यानुसार सुरक्षारक्षक, सफाईकामगार, मदतनीस, स्कूल बस चालकांची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे. तसेच पोलीस यंत्रणेमार्फत चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे आवश्यक आहे.

तक्रार पेटीचे पालन न केल्यास शाळेच्या व्यक्तिशः मुख्याध्यापकास जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाईही होणार आहे. शाळा, केंद्र, तालुका, शहर साधन केंद्र स्तरावर शासन परिपत्रकानुसार सखी सावित्री समिती गठित करण्यात आली आहे. तसेच राज्य स्तरावर शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे.

शाळास्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. त्यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समिती शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात यावी. ही समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेणार आहे.
  
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow