Breaking : कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीच्या संचालकांवर अखेर गुन्हा दाखल

May 24, 2024 - 21:11
 0
Breaking : कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीच्या संचालकांवर अखेर गुन्हा दाखल

रत्नागिरी : रोजगार देतो असे सांगत लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक केल्याची बातमी सुमारे महिनाभरापूर्वी रत्नागिरी खबरदार मधून प्रसिद्ध झाली होती. मात्र या कंपनीचे संचालक आपले पैसे परत करतील या आशेवर अनेकजण पोलिसात तक्रार द्यायला पुढे येत नव्हते. काल अखेर एका गुंतवणूकदाराने पुढे येत आपली १८ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात स्थानकात दिली आहे. या तक्रारी नुसार आरजू टेक्सोल कंपनीचे प्रसाद शशिकांत फडके रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर, अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्यावर भा.दं.सं.क. ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपींनी जून २०२१ मध्ये आरजू टेक्सोल हि कंपनी स्थापन केली होती. २५ हजार ते ४० लाख रुपये पर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या १५ महिने, ३६ महिने व ६० महिने या मुदतीच्या स्कीम सांगून आरोपींनी फिर्यादी यांना खिळे बनवण्याचे अॅटॉमिक मशीन, कच्चा माल तसेच माल तयार केल्यावर मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले होते. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या १८ लाख रुपयांवर १६ टक्के प्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा देतो तसेच १५ महिने पूर्ण झाल्यावर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत देतो असे देखील सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे अॅग्रीमेंट देखील करून देतो असे आरोपींनी सांगितले होते. मात्र अजावर असे कोणतेही अॅग्रीमेंट केले नाही व मोबदला म्हणून कोणतीही रक्कम देखील दिली नाही असे तक्रारदराचे म्हणणे आहे. आरोपींनी संगनमताने १८ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रार दराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

◼️ एक महिन्यापूर्वी खबरदार ने केला होता भांडाफोड
२५ हजारापासून लाखो रुपये गुंतावणाऱ्या अनेकांची फसगत या कंपनीकडून झाल्याचे बोलले जात आहे. हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात जाऊ शकतो अशी चर्चा देखील आहे. याची माहिती मिळताच इतरांनी सावध व्हावे यासाठी रत्नागिरी खबरदार मधून याबाबत वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र त्यावेळी फसगत झालेल्या एकाही गुंतवणूकदाराने पुढे येऊन पोलिसात जाण्याचे धाडस दाखवले नव्हते. आज ना उद्या आपले पैसे मिळतील या आशेवर सारे गुंतवणूकदार जगत होते. या कंपनीचे संचालक स्थानिक आहेत, उगाच चुकीची बातमी देऊन त्यांची बदनामी कशाला करता असे देखील काहींनी आम्हाला सांगितले होते. आज अखेर वस्तुस्थिती समोर आली. अनेकांनी पै पै करून जमवलेले पैसे या कंपनीत गुंतवले होते. काही महिलांनी तर आपले दागिने विकून या कंपनीत गुंतवणूक केली होती. अशाच पद्धतीने अनेक कंपन्यांनी आजवर रत्नागिरीकरांना चुना लावलेला आहे, मात्र अजूनही शहाणपण येताना दिसत नाही. आज एकाने धाडस करून पोलिसात तक्रार दिली आहे. हेच धाडस इतर गुंतवणूकदरांनी दाखवले तर कायदेशीर मार्गाने गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow