भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते : बच्चू कडू

Sep 17, 2024 - 16:49
 0
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते : बच्चू कडू

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला काही मतदारसंघात उमेदवार बदलण्यास सांगितले. त्या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. याबद्दल शिवसेनेच्या विद्यमान खासदारांकडून नंतर नाराजी व्यक्त करण्यात आली.

आता आमदार बच्चू कडू यांनी याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

महायुतीत उमेदवारी देण्याबद्दल पुन्हा एकदा सर्व्हेची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “सर्व्हे तर अमरावतीतला भाजपाच्या विरोधात होता. आणि भाजपाचे अर्ध्याहून अधिक पदाधिकारी नवनीत राणांच्या विरोधात होते. मग इथल्या सर्व्हेमध्ये राणांची जागा निवडून येऊ शकत नाही, असे असताना त्यांना का बदलले नाही?”, असा सवाल बच्चू कडू यांनी भाजपाला केला.

ज्याच्या घरचे काम, त्याला करू द्या; बच्चू कडूंचे भाजपाला खडेबोल

बच्चू कडू म्हणाले, “तुम्ही यवतमाळची जागा बदलली. तुम्ही हिंगोलीची जागा बदलली शिवसेनेची. म्हणजे जागा आहे शिवसेनेची आणि भाजपा सर्व्हे करते आणि सांगते की तुम्ही इथे दुसरा उमेदवार द्या. ज्याच्या घरचे काम आहे त्याला करू द्या ना. दुसऱ्याने हस्तक्षेप करू नये”, अशा शब्दात बच्चू कडू यांनी भाजपाला खडेबोल सुनावले.

“युतीचा धर्म खरेतर भाजपाने व्यवस्थित पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते. कुठलाही पक्ष स्ट्राईकवरूनच जागावाटप करणार आहे. मग ते आघाडी असो वा युती. निवडून येणारा माणूस गांजा विकणारा असला, तरी त्याला तिकीट दिले जाणार आहे. त्यात काय?”, असे भाष्य बच्चू कडूंनी केले.

“…तर मराठा आणि ओबीसी वाद मिटेल”, कडूंनी काय सूचवला पर्याय?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. त्याचबरोबर सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठीही जरांगे आग्रही आहेत.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल बच्चू कडू म्हणाले, “मला असे वाटते की, केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आहे. जर १० टक्के आरक्षण ओबीसींना वाढवून दिले. म्हणजे मराठा आणि ओबीसी असा वादही मिटेल आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणही भेटेल”, असा पर्याय बच्चू कडूंनी सूचवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 17-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow