भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार?; सूत्रांची माहिती

Sep 19, 2024 - 12:26
 0
भरत गोगावलेंना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार?; सूत्रांची माहिती

मुंबई : शिंदे गटात सुरुवातीपासून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांना अखेर महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज दुपारपर्यंत त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा तसेच महामंडळांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. यामध्ये आता भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची वर्णी लागली आहे.

शिंदे गटातील तीन आमदारांची नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेकडून करण्यात येत असलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांवरून अजितदादा गटात नाराजी निर्माण झाली आहे.

सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, विधानसभा निवडणुकाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद मिळत असल्याने गोगावले हे पद स्विकारणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एसटी महामंडळाचे पदही कॅबिनेट दर्जाचे आहे. गोगावले यांनी यापूर्वीच सत्तांतरानंतर अनेकदा मंत्री मिळण्याबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, आता त्यांची बोळवण एसटी महामंडळावर केली जात आहे. भरत गोगावले यांचे मंत्रीपद विरोधकांच्या टिंगलटवाळीचा विषय झाला होता. भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळण्याची खात्री असल्याने त्यांनी शपथविधीसाठी खास कोट शिवून घेतला होता. मात्र, त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने तो कोट तसाच पडून आहे, अशा शब्दांत विरोधकांनी गोगावले यांना अनेकदा खिजवले होते. मात्र, आता मंत्रीपद नाही पण किमान एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्याने भरत गोगावले यांच्या कोटाची घडी मोडणार, अशी चर्चा रंगली आहे.

भरत गोगावले एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारणार का?

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत राजकीय संसार थाटल्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांनी अनेकदा आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनाही प्रत्युत्तर देण्याचे कामही ते सातत्याने करत असतात. त्यामुळे भरत गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पहिल्या कॅबिनेट विस्तारातच त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली होती. त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेण्याचा योग भरत गोगावले यांच्याबाबत अद्यापही जुळून आलेला नाही. त्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याचे सांगितले जाते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow