'संघातील सर्वोच्च नेत्यांकडून नरेंद्र मोदींना पर्याय शोधण्याचं काम'; संजय राऊतांचा मोठा दावा

Jun 6, 2024 - 15:07
 0
'संघातील सर्वोच्च नेत्यांकडून नरेंद्र मोदींना पर्याय शोधण्याचं काम'; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजप आणि भाजपप्रणित एनडीए (NDA) आघाडीला अपेक्षित यश मिळालेले नाही. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश यासारख्या महत्त्वाच्या राज्यांत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत.

वारणसी या मतदारसंघात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं मताधिक्य घटलेलं आहे. याच कारणामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग सोपा नाही. मोदींनी सरकार स्थापन करण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला तरी त्यांचे सरकार टिकणार नाही. मी हे तुम्हाला खात्रीने सांगतो. भाजप पक्षात मोदींना विरोध आहे. त्यांना संघाचाही विरोध आहे. संघातील सर्वोच्च नेते मोदी यांना पर्याय शोधण्यावर काम करताना मला दिसतंय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गुलाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे संघ आज अशा स्थितीत आहे की, तो एखादा निर्णय घेऊ शकतो आणि मोदींना घरी पाठवू शकतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.

मोदी लकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणार

दुसरीकडे भाजप प्रणित एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली चालू आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे. देशभरातील एनडीएतील इतर पक्षांनीही भाजपाला पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यानंतर आता मोदी यांनी राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. लवकरच ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

शिंदे गट, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किती मंत्रिपदे मिळणार?

एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाला एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्रिपद आणि शिंदे गटाला एक मंत्रिपद तर दोन राज्यमंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 06-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow