मंडणगड तालुक्यात खरिप हंगामातील लागवडीखालील क्षेत्रात घट

Jun 6, 2024 - 11:09
Jun 6, 2024 - 16:12
 0
मंडणगड तालुक्यात खरिप हंगामातील  लागवडीखालील   क्षेत्रात   घट

मंडणगड : तालुक्यात खरीप हंगामातील शेतीसाठी मशागतीची कामे सुरू झाली असून, शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तालुक्यात शेतीतील मुख्य पीक भात पीक असले तरीही नाचणी, वरी ही पिके खरीप हंगामात घेतली जातात. कृषी व शेतीपूरक व्यवसायांवरच मंडणगड तालुक्याचे अर्थकारण अवलंबून आहे. मागील सहा-सात वर्षांत विविध कारणांमुळे तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्रात निम्म्याहून अधिक प्रमाणात झालेली घट ही चिंतेची बाब ठरत आहे.

तालुक्यात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५९४७.४५ हेक्टर आहे. मात्र हे प्रमाण कालांतराने कमी-कमी होत गेले. २०२३-२४ मध्ये २,६५१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली होते. तर यंदाच्या हंगामात ते २,९१६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. निम्म्याहून अधिक प्रमाणात लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना कालावधीत लागवडीखालील क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली. 


बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल, विविध कृषी क्रांती झाल्या असल्या तरी मंडणगड तालुक्याची कृषिविषयक परिस्थिती अगदीच विरोधाभासाची आहे. तालुक्यातील कृषी क्षेत्रातील अधोगती हा फार चिंतेचा विषय बनलेला आहे. तसा तो जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसाठी लागू आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाकडून कोकणातील कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करण्याबाबत मोठ्या अपेक्षा आहेत.

तालुक्यातील तरुण वर्ग स्थलांतरित होत आहे. गावामध्ये वयोवृद्ध माणसे वास्तव्याला आहेत. त्यातच जंगली श्वापदांचा उपद्रव, पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येणारी शेती, गुंठ्यात क्षेत्राची मर्यादा आणि कुटुंबापुरतेच घेण्यात येणारे उत्पादन ही गंभीर कारणे आहेत. सुप्रिया घोडके, तालुका कृषी अधिकारी

मंडणगड तालुक्याला लाभलेले नैसर्गिक वरदान हे कृषी संपदा वाढविणारे आहे. मात्र तालुक्यासाठी कोणत्याही ठोस धोरणाची अंमलबजावणी होत नाही. शाश्वत रोजगारासाठी शेती चांगला पर्याय आहे, हे बिंबवून त्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. तसेच स्थलांतराला पर्याय द्यावा लागेल. समीर पारधी, प्रगतिशील शेतकरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 06/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow