चिपळुणात गटारावरील अतिक्रमण हटवताना झटापट

Jun 7, 2024 - 12:46
 0
चिपळुणात गटारावरील अतिक्रमण हटवताना झटापट

चिपळूण : गटारावरील अतिक्रमण हटविताना बाजारपेठेतील एका दुकानदाराने पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कामगारांसोबतच्या बाचाबाचीबरोबरच दमदाटी व झटापट झाल्याने पालिका प्रशासनाने संबंधित दुकानदाराविरोधात थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी बाजारपेठ परिसरात घडली. या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील व्यापारीवर्गाच्या सूचनेनुसार, पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील गटारे साफसफाईचे काम हाती घेतले आहे. गेले दोन दिवस ही स्वच्छतामोहीम सुरू असून, या दरम्यान दुकानदार, व्यावसायिक यांनी गटारावर टाकलेले लेटर, कडप्पे, स्लॅप यांसारखे अतिक्रमण काढले जात आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वतः या कारवाईत लक्ष घातले आहे. काही ठिकाणी दुकानदार व कामगार यांच्यासोबत शाब्दिक चकमक उडत असल्याने कामगारांनी ही गोष्ट प्रशासनाच्या कानावर घातली होती. त्याची तातडीने दखल घेत बुधवारी गटारांवरील अतिक्रमण हटवण्याची सर्व व्यापारीवर्गाला कल्पना दिली होती. अतिक्रमण न काढल्यास साहित्य जप्त करण्याचा इशाराही दिला होता. 

बाजारपेठ, जुना बसस्टॅड ते नाथ पै चौक, पानगल्ली या ठिकाणी अतिक्रमण विभागप्रमुख संदेश टोपरे, बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत सकाळी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना एका दुकान मालकांनी गटारावर व रहदारीच्या रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशी कपड्यांची जाहिरात करणारे पुतळे उभे केले होते. सूचना करूनही त्यांनी ते हटविले नाहीत.

 त्यामुळे पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तेथील साहित्य जप्त करण्यास सुरवात केली; मात्र याचवेळी दुकानाचे मालक लियाकत सलिम मेमन व त्यांचे कर्मचारी जमीर जैमुद्दीन सय्यद यांनी त्यास अडथळा केला. तसेच अर्वाच्च भाषा वापरून दमदाटी व झटापट केली. याबाबतची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांवकर, आस्थापना विभागप्रमुख राजेंद्र जाधव, संतोष शिंदे, वलिद वांगडे, वैभव निवाते, प्रसाद साडविलकर, गणेश कदम, सचिन शिंदे, रमेश कोरवी, आदींनी धाव घेऊन कारवाई केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मालक व कामगार यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 07/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow