गणपतीपुळे येथे गटारातील सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित

Jun 12, 2024 - 10:29
Jun 12, 2024 - 10:31
 0
गणपतीपुळे येथे गटारातील सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित

रत्नागिरी : तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे कोल्हटकर तिठ्याजवळील विहिरींचे पाणी दूषित झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

गणपतीपुळे येथील आपटातिठा ते कोल्हटकर तिठा या मुख्य मार्गालगत गटाराचे काम मागील काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या गटारामध्ये गणपतीपुळे येथील परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सांडपाण्याची पाईपलाईन जोडल्या आहेत. तेथील पाईप निसटल्यामुळे सांडपाणी जवळच्या विहिरींमध्ये जात आहे तसेच काही ठिकाणी सांडपाणी साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

सांडपाण्याच्या दुर्गंधीचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. काही लोकांच्या विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या विहिरींचेपाणी स्थानिक हॉटेल व्यावसायिक आपल्या स्वतःच्या कुटुंबांसाठी आणि पर्यटकांसाठी करतात; मात्र सध्या पाणी दूषित झाल्यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक व्यावसायिकांनी स्थानिक गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केलेला आहे. अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 12/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow