North West Mumbai Lok Sabha Result: लोकसभेत 48 मतांनी झालेल्या पराभवानंतर अमोल कीर्तिकरांची कोर्टात धाव; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

Jun 12, 2024 - 10:54
 0
North West Mumbai Lok Sabha Result: लोकसभेत 48 मतांनी झालेल्या पराभवानंतर अमोल कीर्तिकरांची कोर्टात धाव; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे (North West Mumbai Lok Sabha Result 2024) शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक निकालाविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी लोकसभा निवडणूक निकालाविरोधात राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात दिलेल्या निर्णयाविरोधात अमोल कीर्तिकर लवकरच कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे.

अमोल कीर्तिकर यांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएममध्ये छेडछाड केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यासोबतच मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिट (SLU) च्या स्टोरेजसाठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धती (SOP) चं पालन केलं गेलं नसल्याचा दावा पत्रामध्ये कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4 जून रोजी जो निकाल दिला, त्या निकाला विरोधात आता अमोल कीर्तिकर लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं कीर्तिकरांनी पत्रात नमूद केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचा शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी पराभव केला होता. रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती आणि या फेर मतमोजणीमध्ये अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर निकालाच्या दिवशी ईव्हीएमची पुर्नमतमोजणी करावी, अशा प्रकारची मागणी अमोल कीर्तिकर यांनी केली होती.

नेमकं काय घडलं?

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow