अमोल कीर्तिकरांच्या निकालाला ठाकरे गट कोर्टात आव्हान देणार, निवडणूक पुन्हा होणार?

Jun 5, 2024 - 12:23
 0
अमोल कीर्तिकरांच्या निकालाला ठाकरे गट कोर्टात आव्हान देणार, निवडणूक पुन्हा होणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. अनेक विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला अनेक ठिकाणी चितपट केले.

यातच उत्तर पश्चिम मुंबईतील निकालावर आक्षेप घेत ठाकरे गट आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा निसटता पराभव झाला. रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाच्यावतीने राष्ट्रपती यांना पत्र लिहिण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आक्षेप घेत राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय ते दाखवून दिले आहे. मस्तवालपणा दाखवणाऱ्यांचे काय होणार हे जनतेनेच दाखवून दिले. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. अमोल कीर्तिकर यांना ६८१ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे ७५ मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यावर कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या १११ पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी २६ फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रवींद्र वायकर यांना ४८ मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow