खेड : गैरकायदा जमाव करत राजकीय पदाधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अत्ताउल्ला तिसेकर यांच्यासह 25 जणांवर येथील पोलीस स्थानकात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. याबाबत किरण तायडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
किरण तायडे हे स्वतःच्या आधारकार्ड केंद्रात कामासाठी आले होते. यादरम्यान, कामानिमित्त खाडीपट्ट्यातील एक महिला कार्यालयात आली होती. सायंकाळच्या सुमारास शटर बंद करत दोघेजण आतमध्ये आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचा गैरसमज करत किरण तायडे यांच्यासह महिलेला समाजातील नातेवाईक व नागरिकांनी कार्यालयातच कोंडून ठेवले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर किरण तायडे यांना पोलीस स्थानकात नेत असताना जमावाने बेदम मारहाण केली होती.
या मारहाणीदरम्यान, किरण तायडे यांचे कपडे देखील फाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 25 हून अधिक जणांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार अत्ताउल्ला तिसेकर यांच्यासह 25 जणांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचाही समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांकडून मारहाणकर्त्यांचा शोध घेण्यात येत असून यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.
खाडीपट्ट्यातील एका गावातील ‘त्या’ महिलेचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकारानंतर रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्थानकाबाहेर समाजातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यानंतर चीघळलेले वातावरण शांत झाले. मारहाणकर्त्यांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 24-09-2024