रत्नागिरी: मांडवी जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; स्थानिकांच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ

रत्नागिरी: शहरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या मांडवी जेटी येथे सोमवारी रात्री एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. एका महिलेने जेटीवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे या महिलेचे प्राण वाचले आहेत.

नेमकी घटना काय?

सोमवारी (ता. ७ एप्रिल २०२६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर परिसरात राहणारी एक महिला मांडवी जेटीवर आली होती. तिने आपली चप्पल जेटीवर काढली आणि ग्रीलच्या कठड्यावरून थेट समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. सुदैवाने, त्या वेळी समुद्राला ओहोटी असल्याने पाण्याची पातळी कमी होती, ज्यामुळे ही महिला बुडण्यापासून बचावली.

स्थानिक नागरिक बनले ‘देवदूत’

महिलेने पाण्यात उडी घेतल्याचे स्थानिक नागरिक ईशान खानविलकर यांनी पाहिले. कोणताही विलंब न लावता ते मदतीसाठी धावले. त्याच वेळी तेथे उपस्थित असलेले स्थानिक नगरसेवक बंटी किर आणि नंदू मोरे यांनीही तातडीने धाव घेत मदतीचा हात दिला. या सर्वांनी मिळून महिलेला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले आणि जेटीवरील बाकावर बसवले.

पायाला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

जेटीवरून उडी मारत असताना ही महिला सिमेंटच्या भागावर किंवा खडकावर आदळल्याने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपस्थितांनी महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Shoping fest Khabardar

परिसरात चर्चेचा विषय

रात्रीच्या वेळी मांडवी जेटीवर पर्यटकांची आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणाची अधिक माहिती घेत आहेत.

महिलेचे प्राण वाचवणाऱ्या ईशान खानविलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 08-04-2026