Bigg Boss Marathi, Tanvi Kolte: ‘बिग बॉस मराठी सीजन ६’ची विनर कोकणची तन्वी कोलते!

Bigg Boss Marathi Season 6 Winner: 11 जानेवारी 2026 रोजी कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठी सिझन 6ने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. 19 एप्रिल रोजी सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला.

या खेळात कोकणच्या मातीतील जिद्द आणि जिगरबाज खेळाचा विजय झाला आहे! संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या तन्वी कोलते हिने ‘बिग बॉस मराठी सीजन ६’चा मानाचा किताब पटकावत महाविजेतेपद मिळवले आहे. मुंबईत पार पडलेल्या अत्यंत उत्कंठावर्धक महाअंतिम सोहळ्यात तन्वीच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१०० दिवसांचा खडतर प्रवास

‘बिग बॉस मराठी सीजन ६’ची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात झाली होती. १७ स्पर्धक, १०० दिवस आणि १०० कॅमेऱ्यांची नजर अशी या कार्यक्रमाची रचना होती. घराघरांत पोहोचलेल्या या शोमध्ये प्रेक्षकांनी सदस्यांचे वाद, मैत्री, खटके आणि भावनिक क्षण अनुभवले. १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये, प्रेक्षकांची मने जिंकत आणि आपल्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर तन्वी कोलतेने ही मानाची ट्रॉफी आपल्या नावावर केली.

बक्षिसांची लयलूट

विजेतेपदासोबतच तन्वी कोलते हिच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. तिला मिळालेली बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:

  • रोख रक्कम: कलर्स मराठी वाहिनीकडून १५ लाख रुपयांची धनराशी.
  • दागिने आणि वाऊचर्स: पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे १० लाख रुपयांचे गिफ्ट वाऊचर आणि रेवा डायमंडची सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी.
  • ई-बाइक: तुनवाल ई मोटर्सची ‘लिथीनो प्रो’ (Lithino Pro) ई-बाइक.
  • विशेष भेट: रितेश देशमुख आणि ‘राज शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक सुंदर फोटो.

“मी आता एक ब्रॅण्ड बनले आहे” – तन्वी कोलते

विजेतेपद मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना तन्वी म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं. सुरुवातीला लोक मला काय काम केलं, काय नाव कमावलं असं विचारायचे, तेव्हा वाईट वाटायचं. पण मी ठरवलं होतं की या घरातून बाहेर पडताना सगळ्यांच्या तोंडी फक्त माझंच नाव असेल. आज मी अभिमानाने सांगते की, मी आले होते तन्वी कोलते म्हणून, पण आता जाते आहे तन्वी कोलते हा एक ब्रॅण्ड बनून!”

तन्वीच्या या विजयाने तिच्या गावी, साखरपा (संगमेश्वर) आणि संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर जल्लोष करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 20-04-2026