कोकणच्या इतिहासाचा शोध: रत्नागिरीत पुरातत्त्व शास्त्रावर मोफत अभ्यासवर्ग; इतिहासप्रेमींसाठी सुवर्णसंधी

रत्नागिरी: कोकणची भूमी ही कातळशिल्पे, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक गुहांनी समृद्ध आहे. या अफाट ऐतिहासिक वारशाचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर तज्ज्ञ संशोधक तयार करण्यासाठी, रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या ‘डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रा’मार्फत पुरातत्त्व विषयावर एका विशेष अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणात प्रथमच असा उपक्रम रत्नागिरीत हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यासवर्ग असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी इतिहास, पर्यटन, संस्कृती आणि धर्म विषयाची आवड असणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. रत्नागिरीसह चिपळूण, राजापूर भागातील विद्यार्थी आणि अभ्यासकांनी या उपक्रमासाठी नावनोंदणी केली आहे. हा अभ्यासवर्ग २० एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विनामूल्य आयोजित केला जाणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “कोकणात पुरातत्त्व संशोधनाला मोठा वाव आहे. स्थानिक विद्यार्थी आणि अभ्यासकांना या विषयाची शास्त्रशुद्ध ओळख मिळाल्यास भविष्यात कोकणच्या इतिहासावर मोलाचे काम होऊ शकेल.”

या पाच दिवसांच्या अभ्यासवर्गात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत:

  • प्रागैतिहासिक कालखंड आणि ताम्रपाषाण युग: ऐश्वर्या म्हसे.
  • मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र: डॉ. योगेश प्रभुदेसाई.
  • नाणकशास्त्र आणि पुराभिलेख विद्या: प्रसन्न खानविलकर.
  • कोकणातील पुरातत्त्व: ऋत्विज आपटे.

अभ्यासवर्गाची वैशिष्ट्ये डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनकर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यशाळेत पुरातत्त्व शास्त्राची मूलभूत ओळख, उत्खनन पद्धती, संशोधन तंत्र, प्राचीन अवशेष, शिलालेख आणि नाण्यांचा अभ्यास यांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. कोर्स पूर्ण करणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क इतिहास आणि पुरातत्त्व विषयात रस असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी इच्छुकांनी 7507134624 किंवा 9028494199 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 20-04-2026