कोल्हापूर/रत्नागिरी: स्वातंत्र्योत्तर भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे ‘पॉकेट डायनॅमो’ म्हणून ओळखले जाणारे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना अखेर त्यांचा हक्काचा सन्मान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने खाशाबा जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देण्याबाबत केंद्र सरकारला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या पुरस्काराबाबत येत्या ४ मे २०२६ पूर्वी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
कोर्टाचा केंद्र सरकारला दणका
‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’च्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारकडून सातत्याने होणारी दिरंगाई आणि वेळकाढू धोरणामुळेच हा सर्वोच्च नागरी सन्मान इतकी वर्षे रखडला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. खाशाबा जाधवांच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत, येत्या ४ मे २०२६ पर्यंत यावर अंतिम निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
पुत्र रणजित जाधव यांचा प्रदीर्घ लढा
खाशाबा जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. २०१७ मध्ये खाशाबा जाधवांच्या पद्मविभूषण पुरस्काराची फाईल सरकार दरबारी ‘गहाळ’ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करण्याचे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेर हतबल होऊन रणजित जाधव यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते, ज्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे.
कोण होते खाशाबा जाधव? (पॉकेट डायनॅमो)
- जन्म आणि पार्श्वभूमी: १५ जानेवारी १९२६ रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर या छोट्याशा गावात खाशाबा जाधव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव स्वतः एक नामवंत पैलवान होते, त्यांच्याकडूनच खाशाबांना कुस्तीचे बाळकडू मिळाले.
- शिक्षण आणि प्रवास: कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून शिक्षण घेताना त्यांनी बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे कौशल्य आत्मसात केले.
- ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरी:
- १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अनुभव घेतला.
- १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये आर्थिक चणचण असतानाही गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी भाग घेतला आणि ५७ किलो वजन गटात ‘कांस्य पदक’ जिंकले. स्वतंत्र भारतासाठी वैयक्तिक खेळात आलेले हे पहिलेच पदक होते.
- निधन: या महान क्रीडापटूचे १४ ऑगस्ट १९८४ रोजी निधन झाले.
देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या या लेकाला, मृत्यूनंतर का होईना पण ‘पद्मविभूषण’ सारख्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात यावे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकार ४ मे पर्यंत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 21-04-2026














