“देवेंद्र फडणवीस सांगा कुठे आणि कधी यायचे?”; महिला आरक्षणावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

नवी दिल्ली/मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्य समितीच्या सदस्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्लाबोल केला आहे. “महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र त्यांचा खरा हेतू महिलांना आरक्षण देणे नसून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून देशाचे तुकडे पाडण्याचा होता,” असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाला स्वीकारत, “कधी आणि कुठे यायचे ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा,” असे थेट आव्हानही त्यांनी दिले आहे.

भाजपचा ‘कुटील डाव’ काँग्रेसने हाणून पाडला

प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक सर्वसंमतीने पास झाले होते, परंतु भाजपने त्यात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या जाचक अटी टाकल्या होत्या. काँग्रेसची मागणी होती की, कोणत्याही अटीशिवाय विद्यमान ५४३ जागांवरच ३३ टक्के आरक्षण लागू करावे. मात्र, भाजपने याकडे दुर्लक्ष केले. “दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचा भाजपचा डाव होता, जो काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीने हाणून पाडला आहे,” असेही त्या म्हणाल्या.

महिला अत्याचारांवरून भाजपला घेरले

केवळ आरक्षणावरच नव्हे, तर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही प्रणिती शिंदे यांनी भाजपला धारेवर धरले. त्यांनी मणिपूर, हाथरस, उन्नाव, बदलापूर आणि खरात प्रकरणांचा उल्लेख करत भाजपच्या काळात महिलांवर अन्याय झाल्याचे नमूद केले. प्रणिती शिंदे यांनी भाजपला एक थेट सवाल केला: “भाजपच्या संपूर्ण इतिहासात आजवर एकही महिला भाजपची राष्ट्रीय अध्यक्ष झाली नाही, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे.” रा. स्व. संघ आणि भाजपमध्ये महिलांना किती स्थान आहे, हे यावरूनच स्पष्ट होते, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसनेच दिली महिलांना शक्ती – खासदार शोभाताई बच्छाव

यावेळी खासदार शोभाताई बच्छाव यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, “तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज विधेयकाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, तर सोनिया गांधी यांनी ते ५० टक्क्यांपर्यंत नेले. आज देशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या १५ लाख महिला या काँग्रेसच्या निर्णयामुळेच आहेत. भाजप केवळ खोटे ‘नेरेटिव्ह’ पसरवत आहे, महिला त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत.”

भाजप तोंडावर पडली?

खासदार बच्छाव यांनी पुढे म्हटले की, २०२३ मध्येच हे विधेयक लागू केले असते, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १८० महिला खासदार संसदेत दिसल्या असत्या. भाजपने अटी लावून महिलांचे नुकसान केले असून, हा पक्ष महिला विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भाजपने रचलेले निवडणुकीतील मतदारांना प्रभावित करण्याचे हे षडयंत्र आता त्यांच्यावरच उलटले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 21-04-2026