जलसंवर्धन आणि वन्यप्राण्यांच्या तहान भागवण्यासाठी निस्वार्थ सेवा; चिपळूण पंचायत समितीकडूनही झाली होती कार्याची दखल
सावर्डे:
चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील विकास वसंतराव घाग आणि त्यांचे बंधू महेश वसंतराव घाग हे पिछले १६ वर्षांपासून कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. दरवर्षी आपल्या स्वतःच्या खर्चातून १२ ते १५ वनराई बंधारे उभारण्याचा त्यांचा हा उपक्रम संपूर्ण परिसरासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
पावसाचे वाहून जाणारे पाणी प्रभावीपणे अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि उन्हाळ्याच्या दिवसांत जाणवणारी तीव्र पाणीटंचाई दूर करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दहिवली बुद्रुकसह परिसरातील इतर गावांमध्ये आणि विविध रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणीही घाग बंधू हे वनराई बंधारे बांधतात.

वन्यप्राण्यांच्या पाण्यासाठी दुर्गम जंगलात खणतात डुरे
केवळ जलसंवर्धनच नव्हे, तर उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्याची होणारी भटकंती कमी करण्यासाठी ते दुर्गम जंगल परिसरात पाण्याचे डुरे खणण्याचे कौतुकास्पद कामही करतात. तसेच, इतर नागरिकांनाही वनराई बंधारे उभारणीचे तंत्र आणि पाणी नियोजनाबाबत ते मोलाचे मार्गदर्शन करत असतात.
प्रशासकीय स्तरावर गौरव आणि सामाजिक योगदान
विकास व महेश घाग यांच्या या निस्वार्थ जलसंवर्धन कार्याची दखल घेत २०१५-१६ मध्ये चिपळूण पंचायत समितीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले होते. दहिवली येथे दहा बंधारे उभारण्यासाठी केलेले सहकार्य आणि वन्यप्राण्यांच्या पाण्याची अचूक व्यवस्था केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला होता. तत्कालीन सरपंच रुपेश रवींद्र घाग यांनी त्यांच्या या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून विशेष पुढाकार घेतला होता.
बदलते हवामान आणि पाण्याची वाढती गरज पाहता घाग बंधूंचे हे सातत्यपूर्ण कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. शासनाच्या योजनांसोबतच नागरिकांनीही जर स्वयंस्फूर्तीने जलसंवर्धनासाठी पुढे पाऊल उचलले, तर प्रत्येक गावात जलसमृद्धी निर्माण होऊ शकते, असा मोलाचा संदेश यांच्या कार्यातून मिळतो.













