फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांसमोर आवाहन; मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांच्या उपस्थितीत सामूहिक शपथ
रत्नागिरी:
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या उद्देशाने एका विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर इको क्लबचे शिक्षक धनाजी वाघमोडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
मार्गदर्शन करताना शिक्षक धनाजी वाघमोडे यांनी दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण असून तो पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता साजरा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडल्यामुळे हवा व ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होते. या फटाक्यांच्या धुरामुळे आणि विषारी वायूमुळे मानवी आरोग्यावर, विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांवर विपरीत परिणाम होतो, अशी माहिती त्यांनी दिली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे केवळ मानवांनाच नव्हे, तर रुग्ण व पशुपक्ष्यांचाही मोठा त्रास सहन करावा लागतो.

दरवर्षी फटाक्यांमुळे घडणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे गरजेचे आहे. त्याऐवजी दिव्यांची आरास, आकाशकंदील, रांगोळ्या, फुलांची सजावट करून पारंपरिक पद्धतीने सणाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ
अध्यक्षांच्या भाषणात मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःपासून करावी आणि आपल्या कुटुंबियांना तसेच परिसरातील नागरिकांनाही याविषयी जागरूक करावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. प्रकाशाचा हा सण निसर्गाला साजेसा असावा आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.













