CJP Delhi Protest: “दिल्ली काय मोदी-शाहांच्या घरची प्रॉपर्टी आहे का?”; अभिजित दिपके यांचा जोरदार हल्लाबोल

जंतर मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी नाकारल्याने वातावरण तापले; १० ऑक्टोबरला आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार

CJP Delhi Protest अंतर्गत दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ‘सीजेपी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “दिल्ली ही नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे का? सगळ्या मेट्रो बंद करून टाकल्या, रेल्वे बंद करून टाकल्या, रस्ते ब्लॉक करून टाकले. आणीबाणीतही रेल्वे बंद झाल्या नव्हत्या. किती लोकांना डिटेन करतील? मी चाललोय, मलाही अटक करा, मलाही डिटेन करा. सौरभ दास, आशुतोष रांका तयार आहेत,” असा थेट इशारा अभिजित दिपके यांनी प्रशासनाला दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आणि ‘कॉकरोच पार्टी’तर्फे १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना दिपके म्हणाले, “ज्ञानेश कुमारांनी १३ कोटी मतं हटवण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतली होती का? सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म ६ मधील बदलाला मंजुरीसुद्धा दिली नव्हती. मग ज्ञानेश कुमार कोणालाही न कळवता एवढा मोठा निर्णय घेतात, तर कलम १९ नुसार मिळालेल्या घटनात्मक हक्काच्या आधारावर आंदोलन करण्यासाठी आम्हाला परवानगीची काय गरज आहे? जंतर मंतर हे आंदोलनासाठीच निश्चित केलेले ठिकाण आहे.”

सरकारच्या कारवाईवर जोरदार टोला लगावताना ते पुढे म्हणाले, “या सरकारने आमच्या आंदोलनापूर्वीच रेल्वे आणि रस्ते बंद केले आहेत. आंदोलनापूर्वी या सरकारला वाटणारी भीती पाहता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आधी आपला रक्तदाब (Blood Pressure) तपासून घ्यावा. ज्ञानेश कुमार यांच्या पाठीशी हे सरकार इतके का उभे आहे? यावरून स्पष्ट दिसतं की राजाचं आयुष्य पोपटाच्या हातात आहे; ज्ञानेश कुमार हा तोच पोपट आहे, त्याला पकडले तर राजासुद्धा जाईल.”

दरम्यान, १० ऑक्टोबरच्या या आंदोलनापूर्वीच दिपके यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर (X) पोस्ट करत इशारा दिला होता की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास देशभरातून कार्यकर्ते दिल्लीत पोहोचतील. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतरवर जाण्यापासून रोखल्यास, जिथे थांबवले जाईल तिथेच ‘जंतर मंतर’ उभारून आंदोलन केले जाईल, असा आक्रमक पवित्रा सीजेपीने घेतला आहे.

Tata harrier

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 09-10-2026