Satavali Fort Cleanliness Campaign: लांजातील शिवकालीन साटवली गढीवर स्वच्छता मोहीम

ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धनासाठी तरुणाईचा पुढाकार

Satavali Fort Cleanliness Campaign उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साटवली गढीच्या ठिकाणी ‘शिवगंध प्रतिष्ठान, लांजा’ आणि ‘श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा’ च्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक साटवली गढीने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जलमार्गाने मालाची वाहतूक करण्यासाठी साटवली येथील बंदर आणि गढीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या काळात लांजा तालुक्यातील हे एक प्रमुख व्यापारी केंद्र मानले जात होते. मात्र, काळाच्या ओघात आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ही ऐतिहासिक गढी अंतिम घटका मोजत आहे. लांजा तालुक्यातील या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन-संवर्धन व्हावे आणि सध्याच्या तरुण पिढीला या इतिहासाची माहिती व्हावी, या उद्देशाने या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमेदरम्यान एन.एस.एस. विभागाचे प्रा. राहुल मराठे यांनी स्वतः उपस्थित राहून स्वयंसेवकांसह श्रमदान केले. तसेच या उपक्रमासाठी ॲड. ओमकार गांगण यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शिवगंध प्रतिष्ठानतर्फे आयोजित ही ‘शिवकालीन साटवली गढी स्वच्छता मोहीम’ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 09-10-2026

Tata altroz