रत्नागिरी:
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
बंदीच्या काळात कोणत्याही यांत्रिक नौकेने समुद्रात जाऊ नये, असे कडक आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सा.वि. कुवेसकर यांनी केले आहे.
पारंपरिक मासेमारीला सूट; यांत्रिक नौकांना १ जूनपूर्वी परतावे लागणार
हा आदेश केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना लागू राहील. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी १ जूनपूर्वी आपल्या संबंधित मासेमारी बंदरात परतणे अनिवार्य आहे. तसेच, ३१ जुलै किंवा त्यापूर्वी कोणत्याही नौकेला मासेमारीसाठी समुद्रात जाता येणार नाही.
दरम्यान, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ सागरी मैलापुढे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांसाठी केंद्र शासनाचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नियम मोडल्यास होणार ‘ही’ मोठी कारवाई (कलम १४ आणि १७ अन्वये दंड)
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून १२ सागरी मैलाच्या आत मासेमारी करणाऱ्यांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम २०२१ च्या कलम १४ आणि १७ अन्वये तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- नियम मोडणाऱ्या नौका आणि नौकेवरील उपसाधने जप्त केली जातील.
- मासेमारी सामुग्री आणि पकडलेली मासळी देखील तात्काळ जप्त होईल.
- संबंधित दोषींवर कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शास्ती (दंड) लादण्यात येईल.
अपघातास नौकामालक स्वतः जबाबदार; शासकीय मदत नाही
मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, बंदीच्या काळात अनधिकृतपणे मासेमारी करताना जर कोणताही अपघात किंवा दुर्घटना घडली, तर अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक किंवा अन्य प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व मच्छीमारांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:42 18-05-2026














