भूमी अभिलेख विभागाचे सर्व्हर अद्ययावत; ७२ तासांत डेटा मायग्रेशन पूर्ण
पुणे :
Property Card Will Registration Online संदर्भात राज्यातील शहरी भागातील नागरिकांना आपल्या मृत्युपत्राची (इच्छापत्र) नोंद मिळकतपत्रिकेवर (प्रॉपर्टी कार्ड) घेण्यासाठी आता नगर भूमापन कार्यालयात खेटे मारण्याची गरज उरलेली नाही. भूमी अभिलेख विभागाने हे काम नागरिकांना घरबसल्या अत्यंत सोप्या पद्धतीने ‘ऑनलाईन’ करण्यासाठी ‘इप्सित’ (Ipsit) या संगणकीय पोर्टलवर नवीन विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय मृत्युपत्रासोबतच भाडेपट्टा, हस्तांतरण करार, रद्द करार, चूक दुरुस्ती आणि कन्फर्मेशन डीड यांसारख्या विविध महत्त्वाच्या व्यवहारांच्या नोंदी मिळकतपत्रिकेवर घेण्यासाठी नवीन आज्ञावली (मॉड्यूल्स) विकसित करण्यात आल्या आहेत.
Property Card Will Registration Online: कोर्ट आदेशाचा फेरफार आता अवघ्या एका दिवसातच
न्यायालयीन किंवा सक्षम अर्ध न्यायालयीन प्राधिकरणाचे आदेश झाल्यानंतर मिळकतपत्रिकेवर आदेश फेरफार नोंद घेण्यासाठी पूर्वी ती फाईल मंजुरीच्या प्रतीक्षा यादीत किमान १५ दिवस पडून राहत असे. मात्र आता नागरिकांची ही प्रतीक्षा संपली असून अपील कालावधी संपलेल्या सर्व न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी रांगेत न अडकता अवघ्या एकाच दिवसात पूर्ण करण्याची स्वयंचलित सुविधा प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.
‘आय-सरिता’ जोडणीमुळे बनावटगिरीला चाप आणि १४ मॉड्यूल्सचा समावेश
नागरिकांना घर, जमीन किंवा सदनिकेची दस्तनोंदणी करताना यापूर्वी मिळकतपत्रिका जमा करावी लागत होती. आता भूमी अभिलेख विभागाने आपली मिळकतपत्रिका प्रणाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ‘आय-सरिता’ प्रणालीशी ‘एपीआय’द्वारे थेट जोडली आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयात सरकारी अभिलेखातील अधिकृत मिळकतपत्रिका संगणकावर आपोआप उपलब्ध होत असून बनावट किंवा फेरफार केलेली मिळकतपत्रिका सादर करून होणाऱ्या खरेदी-विक्रीच्या फसवणुकीला आळा बसला आहे. नगर भूमापन (सिटी सर्व्हे) कार्यालयाच्या कामकाजात पूर्वी केवळ ६ मॉड्यूल्सवर कामकाज चालत होते, ती संख्या आता १४ करण्यात आली आहे.
७२ तास तांत्रिक प्रक्रिया राबवून डेटा मायग्रेशन पूर्ण
भूमी अभिलेख विभागाच्या ‘इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी कार्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम’चे डेटाबेस व्हर्जन अद्ययावत करण्यात आले आहे. यासाठी नुकतीच सलग ७२ तास तांत्रिक प्रक्रिया राबवून सुरक्षित डेटा मायग्रेशन पूर्ण करण्यात आले. सर्व्हरची क्षमता, साठवणूक आणि वेग वाढल्यामुळे नागरिकांना आता ऑनलाईन मिळकतपत्रिका पाहणे, डाऊनलोड करणे आणि फेरफार अर्ज सादर करणे अत्यंत गतिमान व विनाअडथळा शक्य होणार आहे. “राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगर भूमापन क्षेत्रातील नागरिकांना गतिमान व सुलभ सेवा देण्यासाठी अर्बन सिटी सर्व्हेचे सर्व्हर अद्ययावत करण्यात आले आहे,” अशी माहिती जमाबंदी आयुक्त तथा संचालक (भूमी अभिलेख) शैलेश नवाल यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 08-10-2026














