खेड अपघातातील ‘त्या’ ३ वर्षांच्या चिमुरड्याचाही उपचारादरम्यान मृत्यू; भीषण अपघातात माय-लेकावर काळाचा घाला

खेड:

मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर बस थांब्यानजीक झालेल्या भीषण कार अपघातातील गंभीर जखमी चिमुरड्याचाही अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीज इम्रान जसनाईक (वय ३ वर्षे, रा. भोस्ते-जसनाईक-मोहल्ला, खेड) असे या दुर्दैवी चिमुरड्याचे नाव असून, शनिवारी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातात आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण खेड तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

उभा असलेल्या गॅस टँकरला झायलो कारची मागून जोरदार धडक

मिळालेल्या माहितीनुसार, चालक इम्रान मुरादअली जसनाईक (वय ४५, रा. भोस्ते-जसनाईक मोहल्ला) हे आपल्या कुटुंबियांना झायलो कारने (क्रमांक: MH 08 Z 3692) घेऊन मुंबईहून खेडच्या दिशेने येत होते. प्रवास दरम्यान नातूनगर बस थांब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका एलपीजी गॅस टँकरवर त्यांची कार मागून अतिशय वेगाने आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालक इम्रान यांच्या पत्नी मदिहा जसनाईक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.


चिमुरड्याची मुंबईत मृत्यूशी झुंज अपयशी

या भीषण अपघातात अब्दुल अजीज इम्रान जसनाईक (वय ३), सबिया मारुख जसनाईक (वय ३३), सेहरा मारूख जसनाईक (वय ७) आणि स्वतः चालक इम्रान मुरादअली जसनाईक (वय ४५) हे गंभीर जखमी झाले होते.

यातील ३ वर्षीय चिमुरड्या अब्दुलची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.

कार चालकावर गुन्हा दाखल

एकाच अपघातात कुटुंबातील माय-लेकाचा मृत्यू झाल्याने जसनाईक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या भीषण अपघातप्रकरणी कार चालक इम्रान जसनाईक याच्याविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 18-05-2026